सोलापूर : येथील तरटी नाका पोलिस ठाणे परिसरातून एका अल्पवयीन मुलीला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. फौजदार चावडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मध्य प्रदेशातील दोघांना अल्पवयीन मुलीसह इंदूरला जाताना वाटेतच पकडले असून, त्यांना सोलापूरला आणले जात आहे.
शहरात सध्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत कामांवर परप्रांतीय कामगार काम करत आहेत. शहरातील तरटी नाका येथेही स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सातच्या सुमारास या परप्रांतीय कामगारांपैकी तिघांनी येथील एका अकरा वर्षाच्या मुलीला घेऊन मालट्रकमधून इंदूरच्या दिशेने निघाले. आपली मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. तेव्हा ती मुलगी तिथे काम करणाऱ्या कामगारांसोबत दिसली होती, असे काहीजणांनी सांगितल्याने तिच्या आईवडिलांनी तत्काळ फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लगेच फौजदार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी पथक तयार करून मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने धुळे गाठले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेसह दोघांना अटक केली. अल्पवयीन मुलीसह तिघांना सोलापुरात आणले जात आहे.
* स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जुळले प्रेम
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्य प्रदेशातून काही कामगार सोलापुरात आले आहेत. तरटी नाका पोलिस चौकीच्या परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील दीड महिन्यापासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या त्या कामगार असलेल्या मुलाची ओळख त्याच परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काम आता काही दिवसांत संपणार असल्याने त्या मुलाने मुलीसोबत पळून जाण्याचा डाव आखला होता. त्यानुसार पळही काढला. मात्र मुलीच्या घरच्यांनी वेळेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चक्रे हालवून ताब्यात घेतले.