पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील – ठोंबरे यांना आज शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिस कारवाई करीत आहेत. रुपाली पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांकडे मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही या बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तिने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल, अशा आशयाची धमकी दिली. तसेच साताऱ्यातून दाभाडे बोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्तव्येही केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही घटना शनिवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी घडली. धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे पोलिस संरक्षणही मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मनसेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील पक्ष स्थापनेपासून मनसेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कसबा पेठ मतदारसंघातून त्या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने शहराध्यक्ष अजय शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.