लखनौ : प्रेयसीला रात्री भेटायला गेल्यावर तिच्या कुटुंबीयांच्या तावडीत सापडल्यावर प्रियकराची काय आरती होणार आहे का, नाही यथेच्छ धुलाईच होणार आहे. झालेही असेच पण उत्तर प्रदेशात एका प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रेयसीला रात्री तिच्या घरी भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो आणि सकाळी तो त्या घराचा जावई बनतो. चित्रपटात शोभावी, अशी ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये घडली आहे. रामपूरमध्ये रात्री प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो. त्याला बघून संतप्त झालेले प्रेयसीचे कुटुंबीय रात्रभर त्याला बेदम मारहाण करतात.
त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते. त्यानंतर मारहाणीचा खटला दाखल होण्याची भीती असल्याने काहीजण समझौत्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यामुळे रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला प्रियकर त्या घराचा जावई बनतो, अशा प्रकारे या प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाला आहे.
स्वारमधील नगली गावातील तरुणाचे सुमालीतील लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यासाठी नेहमी तिच्या घरी जात होता. मात्र, शुक्रवारी तो मध्यरात्री तिला भेटायला गेला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. मुलीच्या खोलीत तिचा प्रियकर सापडल्याने संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाची रात्रभर धुलाई केली. घरातील आरडाओरडा ऐकून आजूबाजुचे शेजारीही जमा झाले. त्यांनीही त्या प्रियकराला रात्रभर झोडपले. त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलवण्यात आले.
* खटला, मानहाणीमुळे झाला समझौता
प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात मारहाणीचा खटला दाखल करण्याचा विचार केला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. मारहाणीचा खटला दाखल होण्याची आणि बदनामीची भीती असल्याने दोन्ही पक्षांमध्ये समझौत्यासाठी काहीजणांनी पुढाकार घेतला. त्यांच्यात चर्चा करण्यात आली.
मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळील एका मंदिरात दोघांचे लग्न करण्यात आले. रात्रभर मुलीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला तरुण सकाळी त्याच घराचा जावई बनला होता आणि प्रेमप्रकरणाचा शोवट गोड झाला.