मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. तसेच प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. तर एका मुलास चौकशीकरिता ईडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
प्रताप सरनाईक मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.
* चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे.