२००९ च्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील उभे होते तर अपक्ष म्हणूून भारत भालके उभे होते. दादांकडे मोठी फौज होती, त्या तुलनेत भालकेंचा ताफा अगदीच लहान म्हणजे त्यांची एक गाडी. एके दिवशी त्यांच्यासोबत निवडणूक प्रचारात गेलो. भारत भालके यांचे शिक्षण नसले तरी लोकांची नाडी त्यांनी ओळखली होती. अगदी थेट लोकांच्या मनाला भिडेल असा प्रचार त्यांचा असे. त्यांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. पहिलीच सभा त्यांनी मंगळवेढा शहरात घेतली आणि त्यातच ते निवडून आल्यासारखे होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही मी एक दिवस त्यांच्यासोबत फिरलो होतो. हा माणूस लोकांसमोर काय बोलतो, त्यांना कसं जिंकतो हे पाहण्याची माझी उत्सुकता. तिन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या, ते ही तीन विविध पक्षांमधून.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भालके यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांमध्ये मिसळत. कुणाचं बारसं असो की मयत भारत भालके त्या ठिकाणी जाणार. अगदी प्रचारातही ते पहिल्यांदा अशा ठिकाणी जायचे. गडी अगदी हरहुन्नरी. भाई तुम्हाला सांगतो म्हणून गाडीत ठेवलेल्या कडक इस्त्रीच्या टोप्या डोक्यावर बसवत ते बोलत असत. त्यांची चालायची लकब, हातवारे करण्याची पद्धत, भिडण्याची शैली, विनोदाचे अंग, अगदी डाय केलेली दाढी, पांढराशुभ्र कुर्ता त्यांना महाराष्ट्रात वेगळेपण देऊन गेलं. भालके असले म्हणजे आपला माणूस अशीच लोकांची भावना असायची.
काही लोकांनी तर त्यांच्या कार्यालयात जावून त्यांना शिव्या दिल्या. हे भालके यांनाही माहित होतं. मंगळवेढ्याचे लोक कोणाला मानत नाही, आनंदही तितकाच साजरा करतील आणि शिव्याही देतील, हे ते ओळखून होते. रागाला जाणारे नागरिक त्यांच्यासमोर गेले की शांत व्हायचे. मंगळवेढा आणि पंढरपूर हे दोन्ही एकत्र मतदारसंघ असले तरी माण नदीच्या पलीकडचं राजकारण आणि अलीकडचं राजकारण वेगळंं आहे, हे पक्क त्यांनी जाणलं होतं. त्यामुळे पंढरपुरातील भारत भालके हे मंगळवेढ्यात वेगळे वाटायाचे.
एखाद्याचं केलेलं काम त्यांना पक्कं लक्षात राहायचं. त्यामुळे तुमच्या त्या पाहुण्याचं काम केलं बरं का, असे ते कित्येक महिन्यांनीही सांगायचे. साखर कारखानदारी हा त्यांचा प्रमुख विषय असल्याने दामाजी साखर कारखाना त्यांनी मिळविला आणि चालविला. त्यानंतर त्यांचे चेअरमनशी पटले नाही आणि ते सर्व विरोधात गेले. ३५ गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न यासाठी त्यांनी न्यायालयीन लढे दिले.
त्यांना विविध आजाराने गाठले पण ते थांबले नाहीत. विरोधकांशी लढताना त्यांना आजारांशीही सामना करावा लागला. त्यात ते जिंकत गेले. थकल्यासारखे वाटणारे भारत भालके हे कधी उसळी घेतील हे माहिती नसायचे. कोविडशी दोन हात करून आलेले भालके याही आजारातून सहज बाहेर येथील असं वाटायचं. पण यावेळी हा पैलवान मृत्यूचा डाव समजू शकला नाही. यात भालके यांना हार मानावी लागली. हा त्यांचा शेवटचा पराभव ठरला. भारत भालके यांच्या मृत्यूने एक प्रखर नेता, लढवय्या कार्यकर्ता, विजिगीषुवृत्तीचा दमदार आमदार हरविला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
* समीर इनामदार