हैदराबाद : भाजपने राष्ट्रीय मुद्दा बनविलेल्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) सर्वाधिक 55 जागा मिळविल्या आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘ईव्हीएम’ नाही, तर ‘बॅलेट पेपर’ने मतदान झाले. मतपत्रिकांची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जुन्या पद्धतीचे जनतेने स्वागतच केले आहे.
भाजप 48 जागांवर, तर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी आवश्यक 76 जागा न मिळाल्यामुळे हैदराबाद महापालिकेचा निकाल त्रिशंकु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘एमआयएम’ला हैदराबाद शहरातील जुन्या भागात प्रतिसाद मिळाला. ‘एमआयएम’ने 44 जागा जिंकल्या आहे.
काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली. अवघ्या दोन जागा मिळाल्या. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.
* सत्ता काबीज करण्याचे मनसुबे उधळले
‘ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ची (जीएचएमसी) निवडणूक ही भाजपने प्रतिष्ठsची बनविली. महापालिका निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील डझनभर मंत्री प्रचारासाठी आले. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा पोस्टल मतदान मोजले गेले. पहिल्या फेरीचा कल भाजपच्या बाजूने होता; पण दुपारनंतर भाजप पिछाडीवर पडली आणि सत्ता काबीज करण्याचे मनसुबे उधळले गेले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करू, असे जाहीर केले होते. भाजपच्या जागा वाढल्या, पण तेलंगणाच्या राजधानीतील मतदारांनी पूर्ण कौल दिला नाही. मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांच्या ‘टीआरएस’ला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.