पुणे : अवघ्या जगाचे लक्ष कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटकडे लागलेले आहे. मात्र याच दरम्यान सिरमसह सर्व भारतीयांना भूषणावह अशी एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर केला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादनाची क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था ठरत असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांची ‘Asian Of the Year’ म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरचं दैनिक ‘द स्ट्रेट्स टाईम्स’ने आदर पुनावाला यांच्यासह सहा जणांना ‘एशियन ऑफ द इयर’ सन्मानासाठी निवडलं. यावर्षी Covid -19 साथीविरुद्ध लढ्यात योगदान देणाऱ्यांची निवड या सन्मानासाठी केली आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अॅस्ट्राझेन्कासोबत कोविड -19 ची लस निर्माण करण्याचं काम करीत आहेत. सध्या भारतात या लशींच्या चाचण्या सुरू आहेत.
या यादीत आदर पुनावालांव्यतिरिक्त इतर पाच जण आहेत. यामध्ये चिनी संशोधक झांग योंगझेन आहेत, ज्यांनी कोरोना साथीशी संबंधित असणाऱ्या सार्स-सीओव्ही -2 या विषाणूचे जीनोम शोधणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. त्याचबरोबर चीनचे मेजर जनरल चेन वई, जपानचे डॉ. युईची, मोरिशिता आणि सिंगापूरचे प्राध्यापक आई इंग आंग या सर्वांनी विषाणूंविरुद्ध लस बनवण्यासाठी बहुमोल कामगिरी केली आहे. या यादीत दक्षिण कोरीयाचे व्यावसायिक सिओ जंग-जिन यांचंही नाव आहे. त्यांची कंपनी लशीच्या निर्मितीत आणि लस उपलब्ध करुन देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत दिली होती. भारतात सध्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्ट्रेट्स टाईम्सच्या वृत्तानुसार, या सर्व लोकांना ‘दी व्हायरस बस्टर्स’ हे विशेषण देण्यात आलं आहे. जे स्वतःच्या क्षमतेनुसार कोरोना विषाणूचा महामारीला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आदर पूनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी 1966 साली SII ची स्थापना केली होती. 39 वर्षीय आदर पूनावाला यांनी 2011 मध्ये संस्थेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. पुनावाला म्हणाले की, त्यांची संस्था जगभरातील गरीब देशांपर्यंत लस पोहचवण्यासाठी मदत करीत आहे.