गवा, आणि सब्जेक्टिव्ह संवेदनशीलता
गव्याचा मृत्यू चटका वगैरे लावून गेला. ठीकंय. आपल्यातली संवेदनशीलता जागीय. ती सोशल मीडियावरून, पेपरातून, टीव्हीवरून व्यक्त झालीय.
महाराष्ट्रात तसेही गवे कमीच उरलेयत; त्यातला एक गेल्यानं वाईट जरूर वाटलंच. माणूस आहोत आपण. माणसाला वाईट वाटलं, की तो व्यक्त करतोच.
पण, मग प्रश्न पडायला सुरूवात झाली, की रोजच्या जगण्यात आपल्या डोळ्यासमोर अन्याय सुरू असतो, तेव्हा आपण पेटून का नाही उठत?
जीवंत माणसावर अन्याय-अत्याचार होतो. हत्या होतात. तेव्हा आडनावं पाहतो. जात तपासतो. धर्म बघतो. तेव्हा आपली संवेदनशीलता का नाही पेटत?
बलात्काराच्या घटनेचं राजकारण केलं जातं; जिवंतपणी आणि मेल्यानंतरही मेल्यानंतरही मुलीचे धिंडवडे काढले जातात. तेव्हा आपली संवेदनशीलता का नाही पेटत?
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तरेत शेतकरी रस्त्यावर बसून काही एक मागण्या करतो. मारहाणीनं डोळे सुजलेला त्याचा फोटो आपल्याला दहशतवाद्याचा भासवला जातो. तेव्हा आपली संवेदनशीलता का नाही पेटत?
“ठेचून काढा…मारून टाका…हा हरामखोर आहे…तो चोर आहे…”, या आणि असल्या असंवेदनशील, बेभान आणि अमानवी आरोळ्यांना प्रोत्साहन मिळतं, तेव्हा तेव्हा आपली संवेदनशीलता का नाही पेटत?
संवेदनशीलतेसाठी subject ची निवड करायची वेळ येते, तेव्हा समाज म्हणून आपण काय निवडतो…? माणूस की प्राणी…?
सब्जेक्टिव्हली आपण प्राण्याचीच निवड करतो का…? म्हणजे त्याला नाव, आडनाव वगैरे नसतं म्हणून की तो कुठल्या पार्टीचा, डावा-उजवा, प्रादेशिक वगैरे नसतो म्हणून…?
कुणी नासवलीय आपली संवेदनशीलता?
माफ करा…पण, खूपच प्रश्न मागं ठेवून गेलाय मेलेला गवा….
– सम्राट फडणीस