मुंबई : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही यावेली रावसाहेब दानवे यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.
* यावरुन मंत्री बच्चू कडू भडकले
देशभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केल्याने त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवेंवर जोरदार टीका केली आहे.
एवढेच नाहीतर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंच्या घरापर्यंत आम्ही याआधी गेलो होतो, आता घरात घुसून मारावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
* राजू शेट्टी यांनीही केली टीका
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. “भाजपाच्या नेत्यांना किती मस्ती आणि उन्माद आहे हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. दानवे स्वत: अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था पाहतात. त्यांनी जबाबदारीने बोलणं अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करतायत म्हणतायत. यावरुन भाजपाच्या शेतकऱ्यांसाठी काय भावना आहेत हे दिसून येतं. हे निषेधार्ह असल्याचे शेट्टी यांनी म्हटले.
भाजपाचे नेते सोडून या देशातील सगळी जनताच पाकिस्तानी आणि चिनी आहे का असा संशय येऊ लागला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे परिस्थिती बिघडू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी आणि ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान कुठे होते ? असा सवालही त्यांनी विचारला.