आज सकाळी उन्मेष शहाणे याचा व्हाट्स ऍप वर हा फोटो आला , त्या खाली त्याने ह्या चौकाबद्दल लिहावं अशी इच्छा व्यक्त केली आणि मन एकदम चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणीत रमून गेलं !
” मेकॅनिकी चौकात गेला का ? , तीतं समुरच हाय , भागवत टाकीज कडं तोंड करून हुबारलं की , लगीच मान फिरवून बघितलं कनाई , लगीच दिसतंयच बघ ! ” मोहोळच्या एसटी स्टँडवर एकजण दुसऱ्याला पत्ता सांगत होता ,
सोलापूरच्या ” अजंठा लॉज ” चा पत्ता !
तुम्ही म्हणाल याला आज अजंठा लॉज का आठवलं ? आज सकाळी पुण्याहून सोलापुरात पहाटे उतरलो आणि आश्चर्य , मेकॅनिक चौकात सोलापुरातील सगळ्यात जुनं आणि फेमस लॉज ” अजंठा ” आहे तसं दिमाखात उभं आहे ! मेकॅनिकी चौकाच्या नावातच मुळात दम आहे , कुणीतरी ब्रिटिश काळात एक कलेक्टर होता , त्याचं नाव ह्या चौकाला दिलंय , किंवा तिथे पूर्वी मेकॅनिक लोक आपली दुकानं ( गॅरेज ) थाटून बसली होती , कुणीतरी खान नावाचा एक ” रॉयल इंनफील्ड ” म्हणजेच ( बुलेट ) रिपेयर करणारा खूप प्रसिद्ध मेकॅनिक होता ( बुलेटच्या फायरिंगच्या आवाजाने तो फॉल्ट ओळखायचा ) म्हणून चौकाला मेकॅनिक चौक म्हणत असावेत . त्या चौकात
” मेकॅनिकी ” नावाचं एक नाट्यगृह होतं आणि तिथे बालगंधर्वांची नाटकं बघितल्याचं काही लोक सांगायचे , म्हणून त्या चौकाचं नाव मेकॅनिकी चौक असावं . पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी दिलेली माहिती…
मेकॅनिकी नावाचे ब्रिटिश काळात कलेक्टर होते. या परिसरात त्यांनी सुधारणा केल्यामुळे या परिसराला
” मेकॅनिकी चौक ” असे अजूनही म्हटले जाते . या चौकाचे ‘” आझाद हिंद चौक ” असे नामकरण करण्यात आले आहे , परन्तु मेकॅनिकी चौक हा शब्द रूढ झाल्यामुळे कोणीही आझाद हिंद चौक म्हणत नाही . अजंठा लॉजसमोर नवरात्र महोत्सवात 50 वर्षांपासून त्या ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मंडळाचे नाव मात्र आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळ असे आहे. अशी ह्या नावाबद्दल माहिती मिळाली आहे . भागवत टॉकीज , भागवत चाळ आणि अजंठा आजही , त्याच वेशभूषेत दिमाखाने उभं आहे . समोरच्या मीना आणि आशा आपली वेशभूषा बदलून पुन्हा मल्टिप्लेक्सच्या आविर्भावात उभ्या आहेत . पूर्वीच्या काळी सोलापूरच्या ह्या अजंठा लॉज मधे , सिनेमा नाटकांची मंडळी वास्तव्याला असायची , नाटकाची गाडी लॉज समोरच उभी असायची , त्यामुळे मराठी नट मंडळी , सिगरेट बिगरेट ओढायला समोर कधी कधी दिसायची . त्याकाळातली ” भारत भुवन ” आणि
” गदग ” ही हॉटेलं त्यांची बडदास्त ठेवायला जवळ पडायची . अजंठा मधे , ज्योतिषी , महाराज ( काशी मस्तक रेषा भविष्य , हस्त रेषा भविष्य , ) तोमर सारखे भविष्य सांगणारे दाढीवाले , ( आता हे
” तोमर ” नावाचे एक ज्योतिषी त्या लॉज मध्ये , महिनोनमहिने तळ ठोकून असायचे , त्यांच्याकडे भविष्य बघायला गेलेल्या माणसाला ” तोमर णार ” कधी ते अचूक सांगायचे , म्हणून त्याला तोमर ज्योतिषी म्हणायचे ! भगव्या कपड्यातले लोक , जडी बुटीवाले बाबा ,
लोकांच्या सांसारिक , शारीरिक , असाध्य रोग निवारण करणारे , मास्यातून अस्थम्याचे औषधं देणारे , हे सगळे तिथं का उतरायचे हे अजूनही मला समजलं नाही !
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आठवड्यातून , महिन्यातून एकदातरी ह्या हॉटेलचं नाव , न्युज पेपरच्या बातम्यात हमखास असायचं , ( गळफास लावून घायला लोकांना हॉटेलच का लागतं , हे न उलगाडणारं कोडं आहे ) .अजंठा लॉजच्या खाली एक हेअर कटिंग सलून होतं , त्याकाळात ” अमीताभ बच्चन , शशी कपूर , विनोद खन्ना यांच्यासारखी हेअर स्टाईल तिथं करून मिळायची , केस वाढवून ते कानावर फुग्यासारखे गोल करून मिळायचे , ( निदान अंघोळ करेपर्यंत तरी त्या माणसाला , आपण बच्चन आहोत असा फील यायचा , म्हणून हेअर सेटिंग करून आलं की , पोरं चार दिवस अंघोळच करत नव्हती ) भागवत चाळीत तर , एक लॉन्ड्री होती , तिला दरवाजा नव्हता तिला फक्त खिडकी होती ( अजूनही असेल कदाचित ) . हा चौक फक्त रात्री 2 ते 3 शांत असतो , एरवी कायम गर्दी हीच त्याची ओळख आहे .या चौकाने
” मार्शल लॉ ” पासून अगदी आजच्या
” शेतकरी लॉ ” पर्यंत चे सगळे कायदे बघितलेले आहेत . तिथं एका लाकडी जाळीच्या घरात , आयुर्वेदीक डॉक्टर गौतम यांचा दवाखाना होता , त्यांच्याकडे गेलं की समोर पडलेल्या आवळ्याच्या ढिगातून ते आवळा खायला द्यायचे . शेजारीच दत्ताचे देऊळ आणि नवरात्रात , लाकडी रथात उभी असलेली देवी . तिथे एका मोठ्या बोर्डावर रोजच्या रोज ” सरकार विरोधी ” प्रक्षोभक अशा बातम्या लिहिलेल्या असायच्या , तिथेच राजकीय भाषणं वगरे व्हायची , तु . ग्या. इंगळे , असं काहीतरी नाव असलेला इसम हे लिहायचा . शेजारीच ” मिरजकर म्युझिक मार्ट ” होतं ( आता दिसत नाही ) एक मोठी लॉन्ड्री होती , तिथे त्या काळात कपडे धुवायचे मशीन चालु करून ठेवलेले असायचे , मशीनमध्ये कपडे फिरताना बघायला सुद्धा गर्दी व्हायची ! अशा भरगच्च चौकाने किती मोर्चे , मिरवणुका , खून , मारामाऱ्या , वराती , काय काय बघितलं असेल इतक्या वर्षात ? ” आंटी ” च्या हॉटेलातून रोजची भांडणं , मारामाऱ्या , त्याच चौकातल्या पोलीस चौकीत डी . बी. पोलीस खुर्च्या टाकून बसलेले असायचे . विदाऊट युनिफॉर्म , करकरीत बुलेट , खाकी पॅन्ट आणि वर चौकड्याचा शर्ट आणि डोळ्यावर रेबॅन , हे सगळं बघून मला तर लहानपणी , डी. बी. पोलीस व्हावं असं फार वाटायचं . जगात कुठेही नसेल असा ” शाळा , बार आणि पोलीस चौकी ” यांचा त्रिवेणी संगम फक्त सोलापुरात पाहायला मिळतो . भागवत मल्टिप्लेक्स हे तर सोलापूरचे आजही वैभव आहे . उमा , चित्रा , छाया , मीना , आशा , लक्ष्मी , कल्पना , शारदा , यांना वर्षानुवर्षे टक्कर देत , सेंट्रल आणि गेंट्याल उभी आहेत .
भारतभूवन बंद झालं तरी अजून गदग ( रूप रंग नाव ) बदलून उभं आहे . थेटर च्या चौकातल्या सोड्याचे ” चित्कार ” आणि ” मॉलिश ” वाल्यांच्या आरोळ्या आणि टाळ्या हल्ली कमी झाल्या असाव्यात . एकंदरीतच हल्ली हा चौक थोडासा
” मलूल ” झाल्यासारखा वाटतोय , थोडीफार गुंडगिरीच कमी झाल्यासारखी वाटतेय , तरुण पिढी शिक्षित होऊन , पुण्यामुंबईकडे जास्त ओढली जातेय असं वाटतं . जुन्या आठवणी मात्र पुन्हा जाग्या करून , नवीन पिढीला आपण सोलापूर सारख्या ” राज नगरीत ” राहतो याचा एक सार्थ अभिमान वाटावा हीच इच्छा !
* सतीश वैद्य – कलावंत, सोलापूर