बार्शी/ वैराग प्रतिनिधी
अज्ञात कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे घडली आहे.
याबाबत वैराग पोलीस स्टेशनमध्ये मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर पित्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वैराग सोलापूर रस्त्यावरील शेळगाव येथे सदर पती वसंत अंबादास पवार वय 55 हा आपली पत्नी आईनाबाई उर्फ सोनाबाई वय 45 तसेच दोन मुले अनुक्रमे राम वय 31 व द्वितीय पुत्र संभाजी व त्यांच्या पत्नी अश्विनी व अंजना या सुना व नातवंडांसह राहत होते.
तसेच त्यांच्यासोबत मयताचे पिता अंबादास पवार वय 80 हे देखील राहत होते. दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी वसंत पवार यांनी आपल्या पत्नीसोबत भांडण केले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. मयत वसंत पवार याला दारूचे व्यसन होते. त्या सायंकाळी वसंत यांनी पत्नी सोनाबाईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणी मध्ये तिच्या तोंडाला व डोक्याला मोठ्या जखमा होऊन ती रक्तस्त्रावाने मृत पावली. त्यानंतर पती वसंत ने पत्नी सोनाबाई चे शव शेतातील घराजवळच्या चटईवर ठेवले व दिनांक नऊ रोजी सकाळच्या सुमारास शेतातील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी दोन्ही मुले ही सोलापूर येथे एमआयडीसी कारखान्यात कामाला तसेच जाई जुईनगर सोलापूर येथील सासरवाडीत कामानिमित्त गेली होती त्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याबाबत मयताच्या मुलांनी राम पवार यांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत वैराग पोलीस अधिक तपास करीत आहेत.