पुणे, 29 मार्च (हिं.स.)।स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, इथल्या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी इथं उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “आम्ही मागेच तुळापूर आणि वढूचं काम हातात घेतलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम सर्व शंभू प्रेमींना अभिमान वाटेल. तसंच इकडं आल्यानंतर त्यांना देखील मनातून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीच स्मारक बनवण्याचं काम आम्ही सर्वजण करतो आहोत”आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बु. येथील महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं.तुळापूरप्रमाणेच वढू बुद्रुक इथंही भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे.
इथल्या आराखड्यानुसार ४० फूट उंच व २० फूट रुंद भव्य प्रवेशद्वार, तर ६५ फुटी ३२ खांबातून ठराविक ठिकाणाहून दिसणारे शंभूराजांचे इन्व्हिजिबल शिल्प, तसेच वढू बुद्रुक व तुळापूर येथेही प्रत्येकी ६.५० कोटींचा भव्य १०० फुटी हिंदवी ध्वज, समाधिस्थळ, मेघडंबरी, संग्रहालय, ग्रंथालय, तटबंदी यासह भीमा नदीवरील आकर्षक संरक्षक घाट, वाहनतळ, होलोग्राम आधारित चित्रफीत, शंभूराजांच्या कालखंडातील सदर बाजार पेठ अशा विविध संकल्पनांमधून शंभूराजांच्या पराक्रमाला साजेसे भव्य स्मारक साकारण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.