ओटावा , 30 एप्रिल (हिं.स.)। २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह कॅनडातील एका समुद्र किनाऱ्यावर आढळला आहे.ही भारतीय विद्यार्थी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची मुलगी असून, ती कॅनडात शिक्षण घेत होती. ओटावातील समुद्र किनाऱ्यावर तिचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.
मीडिया रिपोर्टनुसार, वंशिका सैनी असे मयत मुलीचे नाव असून, ती आपचे पदाधिकारी दविंदर सैनी यांची मुलगी होती.२१ वर्षीय वंशिका सैनी २२ एप्रिलपासून बेपत्ता होती. ती एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. २२ एप्रिलपासून वंशिका घरी न आल्याने तिच्या रुममेटने २५ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबीयांना कॉल केला. त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. तिला उच्चायुक्तालयात संपर्क करण्यास सांगण्यात आले. तिने ओट्टावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात वंशिका बेपत्ता असल्याची तक्रार दिली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
वंशिकाचे वडील दविंदर सैनी यांनी सांगितले की, तिचे शवविच्छेदन झाले आहे. तिचा मृतदेह परत आणण्यासाठी वेळ लागेल. आमचं तिच्यासोबत शेवटचं बोलणं २२ एप्रिल रोजी झालं होतं.
वंशिकाचे वडील दविंदर सैनी हे आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते आपचे आमदार कुलजीत सिंग रंधावा यांचे सर्व काम पाहतात. वंशिका घरीच आलेली नाही आणि ती बेपत्ता असल्याची माहिती त्यांना २५ एप्रिल रोजी तिच्या रुममेटकडून कळली होती. वंशिकाच्या मृत्यूची माहिती आमदार रंधावा यांनी खासदार राज कुमार छब्बेवाल आणि बलबीर सिंग सिच्चेवाल यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिली. तसेच वंशिकाचा मृतदेह परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती देखील केली.