सोलापूर, 9 सप्टेंबर
महापालिका निवडणुकीसाठी सामान्य लोकांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करावी अशी हरकत एका ज्येष्ठ नागरिकाने महापालिका निवडणूक कार्यालयाकडे नोंदविली आहे. दरम्यान, ३ ते ८ सप्टेंबर या सहा दिवसांत केवळ एक तक्रार/सूचना दाखल करण्यात आली आहे. हरकत व सूचनाबाबत मोठी उदासीनता असल्याचे चित्र आहे.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ३ सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत या रचने संदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र सहा दिवसांत केवळ एक हरकत महापालिका निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर २०२५ रोजी ही एकमेव हरकत प्राप्त झाली आहे. होटगी रोडवरील ब्रह्मदेवनगर येथील राहणारे ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते हा. र. वांगीकर यांनी ही हरकत घेतली आहे. दोन ते चार सदस्य असलेल्या बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धती ही सामान्य लोकांना निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही.