नियतीची कू्ररता
महिन्यापूर्वी पित्याचे छत्र हरपले
आता पोटच्या गोळ्यालाही हिरावले
शाळेत जाताना ट्रॅक्टरच्या धडकेने
14 वर्षाचा मुलगा ठार
माढा तालुक्यातील म्हैसगावावर शोककळा
सुरवसे फॅमिलीवर आघात
सुराज्य -कुर्डुवाडी
म्हैसगाव (ता. माढा) येथे शाळेत निघालेल्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाजवळ घडली. प्रणव बालाजी सुरवसे (वय 14) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो आठवीत शिकत होता.
प्रणव सुरवसे हा मातोश्री कन्या प्रशाला (म्हैसगाव) येथे चालत शाळेत जात होता. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक विद्यालयासमोरील रोडवर तो आला असता ट्रॅक्टरने (एम.एच. 45 एफ 3723) प्रणव यास पाठीमागून धडक दिली. यात तो खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे पाठीमागचे चाक गेले. त्यास खासगी वाहनाने ग्रामीण रूग्णालयात उपचारास आणले असता तेथील डॉक्टरांनी प्रणव यास तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी गावातील समाधान ट्रॅक्टरचालक संपत वसेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर टॅ्रक्टर जागेवरच सोडून तो पसार झाला आहे.
दुःखाचा डोंगर
सुरवसे फॅमिलीची परिस्थिती गरिबीची आहे. जेमतेम शेती आहे. प्रणवचे वडील बालाजी हे चालक म्हणून नौकरी करत होते. एका महिन्यापूर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. कर्ता माणूसच गेल्याने सुरवसे फॅमिलीवर आणखीन प्रतिकूल परिस्थिती ओढवली. त्यावर मात करून या कुटुंबाने यशाची वाटचाल ठेवली होती. प्रणव याला दोन बहिणी आहेत. एकीचे लग्न झाले असून दुसर्या बहिणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. प्रणव हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्यालाही नियतीने हिरावून नेल्याने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावावर शोककळा पसरली आहे. गृहिणी सोनाली यांच्यावरचा दुःखावेग पाहून आसपासच्या लोकांनाही दुःखाश्रू अनावर झाले होते.