नाशिक, 17 मे (हिं.स.)।
आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने करंजाळी येथील हॉटेलमध्ये सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.
स्वीय सहाय्यक गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकांवरून वारंवार फोन येत होते. फोन करणारा इसम स्वतःला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत मदतीच्या मोबदल्यात १ कोटी रुपये मागत होता. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली होती. मात्र स्वीय सहाय्यक यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम पंच साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीकडे देण्याचे ठरवले.
धरमपूर येथे आरोपीची वाट पाहूनही तो न आल्याने पथक परतीच्या मार्गावर असताना आरोपीने पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे येण्यास सांगितले. येथे सापळा लावून पोलीसांनी संशयित आरोपी राहुल दिलीप भुसारे (वय २७, रा. करंजाळी, ता. पेठ) यास रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून एक होंडा शाईन मोटारसायकल, मोबाईल फोन, ५०० रुपयांच्या ६० खऱ्या नोटा, तसेच खेळण्यातल्या नोटांचे १५ बंडल (एकूण अंदाजे ८५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.