प्रादेशिक परिवहन अधिकारी – उर्मिला पवार यांची माहितीअमरावती, 4 जुलै (हिं.स.)
राज्यात 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच ‘ एचएसआरपी ‘ बसव णे बंधनकारक केले आहे. यासाठी 30 जून ही अखेरची मुदत देण्यात आली होती. परंतु नंबरप्लेटचा तुटवडा आणि नोंदणीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्यांदा 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची मुदत असून या दिलेल्या मुदतीत नोंदणी न केलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्य परिवहन विभागाने दिला आहे.
परिवहन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील 30 टक्के वाहनधारकांनीच नवीन नंबरप्लेट बदलली आहे. 70 टक्के वाहन धारकांची नोंदणी व्हायची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता ‘ एचएसआरपी ‘ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात सध्या 2 कोटींपेक्षा जास्त जुनी वाहने आहेत. यापैकी केवळ 23 लाख वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आले असून, 40 लाख वाहनधारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली.
त्यामुळे अद्याप जवळपास 1.25 कोटी वाहनांवर नवी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. मोठ्या प्रमाणात तांत्रिक व पुरवठा अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत, 30 एप्रिल आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जुन्या 2 कोटी वाहनांपैकी फक्त 23 लाखांवर वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवल्या आहेत. तसेच काही जणांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करूनही प्लेट मिळालेल्या नाहीत. राज्यातील 60 प्रादेशिक – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडलांत विभागणी केली आहे.
तीन मंडलांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट कशी असते, याची वाहनचालक व वाहनधारकांना तसेच वाहन मालकांना असलेली जिज्ञासा लक्षात घेता, याबाबतीत माहिती पुढीलप्रमाणे आहे. ‘ एचएसआरपी ‘ नंबरप्लेट ही एल्यूनियमपासून बनलेली असतें. तसेच क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉकयुक्त असते. होलोग्राम खाली लेझर बैंडेड 10 अंकी पिन कोड असतो. यासोबतच एक सिरीयल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो.
ही नंबर प्लेट महत्वाची
चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षा कारणांसाठी ही नंबर प्लेट महत्वाची आहे.देशातील सर्वं नवीन आणि जुन्या वाहनांसाठी ‘ एचएसआरपी ‘ बसवणे अनिवार्य आहे.अशी माहिती देण्यासह अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी विदर्भ प्रारजासत्ता बोलतांना दिली.