मुंबई, ३१ ऑगस्ट. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. त्या अवघ्या ३८ वर्षांच्या होत्या. मुंबईनजीक मीरारोड परिसरातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी त्या या दुर्धर आजारातून बरीही झाल्या होत्या. मात्र, अलीकडेच त्यांच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला. कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
ऐन गणेशोत्सवात अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती. त्यांची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील मोनिका तुफान गाजली, पण ही मालिकाही त्यांनी अर्ध्यात सोडली होती. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली.
गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती. त्यांनी शेवटची पोस्ट ११ ऑगस्ट २०२४ रोजी केली होती. ज्यात त्यांनी शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे ती श्रीकांत मोघे यांची सूनही होती.