मुंबई, 17 जून (हिं.स.)।अहमदाबादमधील विमान अपघातात जीव गमावलेल्या एअर इंडिया विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांचे पार्थिव मंगळवारी (दि.१७) मुंबईतील पवई येथील जलवायू विहारमधील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले, जिथे इमारतीबाहेर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभरवाल (५६) हे मुंबईत आपल्या वृद्ध पालकांसोबत राहात होते.
वैद्यकीय प्रयोगशाळेचे अधिकृत प्रतिनिधी सभरवाल यांच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.१३) आले होते. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी मुंबईत त्यांच्या घरी आण्यात आले. जलवायू विहार सोसायटीतील त्यांच्या घरी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.यावेळी व्यवसायिक निरंजन हिरानंदानी आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुमीत सभरवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल आणि इतर नातेवाईकांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर, त्यांच्या पार्थिव असलेल्या शववाहिकेने चाकला इलेक्ट्रिक स्मशानभूमीकडे प्रयाण केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
१२ जून रोजी विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटनं अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलरला ‘मेडे’ कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीच्या कोणत्याही कॉलला प्रतिसाद मिळाला नाही, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १२ जून रोजी लंडनकडे जाणारी एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१, ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते, ती अहमदाबादमध्ये कोसळली. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला, फक्त एक जण वाचला, तसेच जमिनीवर असलेल्या २९ जणांचाही मृत्यू झाला, कारण विमान एका वैद्यकीय संकुलावर आदळले. ही दुर्दैवी फ्लाइट कॅप्टन सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नियंत्रणाखाली होती. डीजीसीएने यापूर्वी दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, सभरवाल यांना ८,२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर कुंदर यांचा अनुभव १,१०० तासांचा होता.
