नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.) – दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या मुंबईला जाणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते विमान रद्द करण्यात आले. या विमानात १६० प्रवासी प्रवासासाठी सज्ज होते. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमधील स्पीड पॅरामीटर्स दाखवणाऱ्या स्क्रीनमध्ये बिघाड आढळून आल्यामुळे पायलटने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या बिघाडानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले व त्यांची सोय दुसऱ्या विमानात करून मुंबईला रवाना करण्यात आले. एअर इंडियाने या तांत्रिक अडचणीबाबत प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या गैरसोयीबाबत कंपनीला खेद आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.