नवी दिल्ली, 11 ऑगस्ट –
एअर इंडियाने १ सप्टेंबरपासून दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पहिले म्हणजे, एअर इंडियाच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे अपग्रेडेशन सुरू असून, त्यामुळे अनेक विमाने दीर्घकाळ उड्डाणासाठी उपलब्ध राहणार नाहीत. हे काम २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे.
दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. १ सप्टेंबर २०२५ नंतर बुकिंग केलेल्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना दोन पर्याय दिले जाणार आहेत – दुसऱ्या फ्लाइटमध्ये बुकिंग किंवा पूर्ण परतावा.
वॉशिंग्टन डीसीला जाणारे प्रवासी अजूनही अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स यांसारख्या एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदारांद्वारे जेएफके, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो किंवा सॅन फ्रान्सिस्को मार्गे प्रवास करू शकतात. या व्यवस्थेत एकाच तिकिटावर बॅगा थेट अंतिम ठिकाणी पोहोचवल्या जातील. एअर इंडिया सध्या उत्तर अमेरिकेतील सहा शहरांमध्ये नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू ठेवणार असून, त्यात कॅनडातील टोरंटो आणि व्हँकुव्हरचा समावेश आहे.