नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : एअरबीएनबीच्या विनंतीवर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने केलेल्या ताज्या संशोधनानुसार, २०२४ मध्ये एअरबीएनबीने भारताच्या अर्थव्यवस्थेत ११३ अब्ज (११,३०० कोटी) रुपये इतके आर्थिक मूल्य निर्माण केले. या वर्षात एअरबीएनबीच्या कार्यकलापांमुळे एकूण १,११,००० नोकऱ्या निर्माण झाल्या. या योगदानातून २४ अब्ज रुपये वेतन उत्पन्न झाले असून, एअरबीएनबी देशाच्या पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेच्या वाढीतील महत्त्वाचा घटक ठरला आहे.
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, २०२४ मध्ये भारतातील एअरबीएनबी पाहुण्यांपैकी जवळपास ९१ टक्के प्रवासी देशांतर्गत होते. २०१९ मध्ये हा आकडा ७९ टक्के होता, त्यामुळे देशांतर्गत पर्यटनातील मागणीतील मोठी वाढ अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे प्रमुख स्रोत ठरले. पाहुण्यांनी एकूण ११२ अब्ज (११,2०० कोटी) खर्च केले, ज्यामध्ये निवासासह जेवण, खरेदी, वाहतूक आणि मनोरंजनासारखे खर्च होते. सरासरी पाहुण्यांनी दोन रात्री मुक्काम केला आणि दररोज सुमारे ११,००० रुपये निवासाबाहेरील आवश्यक गोष्टींवर खर्च केले.
एअरबीएनबीच्या पाहुण्यांच्या खर्चामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली. प्रत्येक १०,००० रुपयांपैकी ३,८०० रुपये रेस्टॉरंट्सवर, २,४०० रुपये वाहतुकीवर, २,१०० रुपये खरेदीवर, ९०० रुपये कला व मनोरंजनावर आणि ८०० रुपये किराणा सामानावर खर्च करण्यात आले. त्यामुळे लघु व सूक्ष्म व्यवसायांना थेट फायदा झाला. होस्ट्सना मिळालेले उत्पन्न देखील घरगुती सेवा, मालमत्तेची देखभाल आणि वैयक्तिक खर्चाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे.
पर्यटन GDP मध्ये एअरबीएनबीचा वाटा ०.५ टक्के इतका असून, पर्यटनाशी संबंधित नोकऱ्यांपैकी ०.२ टक्के नोकऱ्या थेट एअरबीएनबीमुळे निर्माण झाल्या आहेत. वाहतूक व साठवण क्षेत्रात ३८,०००, अन्न व पेय सेवांमध्ये १९,६००, किरकोळ व्यापारात १६,८०० आणि उत्पादन क्षेत्रात १०,७०० नोकऱ्या निर्माण झाल्या. या रोजगारामुळे प्रत्यक्ष वेतन लाभही झाले, ज्यात वाहतूक व साठवण क्षेत्रात ८.१ अब्ज रुपये, उत्पादन क्षेत्रात २.९ अब्ज रुपये आणि रिअल इस्टेट क्षेत्रात २.६ रुपये अब्जांचा समावेश आहे.
अहवालानुसार, भारतातील पर्यटन आता फक्त महानगरापुरते मर्यादित राहिलेले नाही. २०२४ मध्ये शहरी नसलेल्या भागातील एकूण बुकिंग मूल्याचा वाटा १६ टक्के इतका होता. २०१९ च्या तुलनेत यात तीनपट वाढ झाली असून, ग्रामीण पर्यटनात वाढती प्रवासी रुची स्पष्टपणे दिसून येते.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे आशियातील इकॉनॉमिक कन्सल्टिंगचे संचालक जेम्स लॅम्बर्ट यांनी सांगितले की, “भारताचा पर्यटन क्षेत्र देशांतर्गत प्रवाशांच्या मजबूत मागणीवर आधारित आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते शांत गावांपर्यंत भारतीय प्रवासी आपल्या देशाची विविधता शोधत आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात वाढीसाठी ही मोठी संधी असून, यासाठी जागतिक प्लॅटफॉर्मसोबतची भागीदारी आवश्यक आहे.”
एअरबीएनबी इंडिया व दक्षिण-पूर्व आशियाचे कंट्री हेड अमनप्रीत बजाज यांनी म्हटले, “एअरबीएनबी आपल्या होस्ट्स व पाहुण्यांच्या मजबूत नेटवर्कद्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहे. देशांतर्गत प्रवास हा पर्यटनाचा मुख्य आधार ठरत असून, यामुळे सूक्ष्म उद्योजकतेला चालना मिळते, संबंधित क्षेत्रे बळकट होतात आणि ग्रामीण तसेच अपरिचित स्थळांमध्ये व्यवसायांना आधार मिळतो. सरकार व समुदायांच्या सहकार्याने आम्ही पर्यटन क्षेत्रातील शाश्वत व समावेशक वाढीसाठी कटिबद्ध आहोत.”