मुंबई, ७ ऑगस्ट –
देशातील नागरी विमान सेवांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने देशभरातील सर्व विमानतळांवर ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दहशतवादी किंवा समाजकंटकांकडून घातपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
४ ऑगस्ट रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने जारी केलेल्या सूचनांनंतर, देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. विमानतळ, धावपट्ट्या, हॅलीपॅड्स आणि विमान प्रशिक्षण संस्था यांसारख्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रवाशांचे सामान, मालवाहतूक व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी, सीसीटीव्हीवर लक्ष ठेवणे, विमानतळ परिसरातील स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवणे, कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची पडताळणी करणे अशा अनेक सूचना यामध्ये समाविष्ट आहेत.