मुंबई, २५ जुलै – विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्याचा आधार आहे. त्यामुळे विमा संस्थांनी केवळ पॉलिसी विक्रीवर न भर देता जनजागृती, सुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवेवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (IBAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी IBAI चे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल, आयआरडीएआयचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या टी.एल. अलामेलू, उपाध्यक्ष मोहन एस, सचिव निर्मल बजाज तसेच सरकारी आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले की, “प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य जीवन-विमा योजना असायला हवी. मात्र सर्व योजना सर्वांसाठी लागू होत नाहीत. त्यामुळे विमा ब्रोकर संस्थांनी नागरिकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य पर्याय देणे गरजेचे आहे.”
IBAI च्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, गेल्या २५ वर्षांत संस्थेने विमा क्षेत्रात जोखीम जनजागृती, विश्वासार्हता आणि उद्योगांशी नाते निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मात्र, अजूनही भारतातील विमा प्रवेश मर्यादित आहे. २०२३ मध्ये देशाचा एकूण विमा प्रवेश ४.२% इतकाच होता, तर नॉन-लाईफ विम्याचा वाटा केवळ १% होता. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिक अद्याप विमा सुरक्षेपासून वंचित आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विमा ब्रोकर हे विमाधारक आणि विमा कंपन्यांमधील महत्त्वाचा दुवा असून, ते ग्राहकांसाठी योग्य सल्ला आणि उपाययोजना देतात. भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, कॉर्पोरेट विमा आणि लघु-मध्यम उद्योगांसाठी विमा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. यासाठी सुरक्षितता, सहकार्य, ज्ञानवाटप आणि तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यपालांनी यावेळी IBAI च्या २५ वर्षांच्या कार्याचा गौरव करत स्मरणिकेचे प्रकाशन आणि नव्या लोगोचे अनावरण केले. कार्यक्रमात विमा क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन निर्मल बजाज यांनी केले.