जम्मू, ३० जुलै – जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रेवर बुधवारपासून बंदी घातली आहे.
31 जुलै रोजी कोणताही भाविक काफिला पाठवला जाणार नाही
जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी स्पष्ट केलं की, ३१ जुलै रोजी भगवतीनगर (जम्मू) येथून बालटाल आणि नुनवान या आधार छावण्यांकडे कोणताही भाविक काफिला पाठवला जाणार नाही. संततधार पावसामुळे भूस्खलन, ट्रॅक स्लिपिंग आणि इतर संभाव्य आपत्तींचा धोका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
काश्मीर विभागाचे आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनीही सांगितले की, बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बालटाल आणि चंदनवाडी मार्गांवर भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
यात्रा ३ जुलैपासून सुरू, ९ ऑगस्टला समाप्त
अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली होती आणि ती ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी समाप्त होणार आहे. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. याआधीही १७ जुलै रोजी खराब हवामानामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.
भाविकांसाठी प्रशासनाची सूचना
पावसामुळे रस्ते आणि ट्रॅक घसरत्या स्थितीत आहेत, त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील निर्णय हवामानाच्या स्थितीनुसार घेतले जातील. प्रशासन भाविकांना वेळोवेळी अद्ययावत माहिती देत राहील.