पुणे, 17 सप्टेंबर। ‘आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ ही संघटना सन २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता व विद्यार्थिनींसाठीचा स्वच्छता प्रसाधन भत्ता दुपटीने वाढविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार विभागीय स्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ₹१५०० करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ₹१३०० करण्यात आला आहे. तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ₹१००० करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थिनींसाठी ‘स्वच्छता प्रसाधन’ भत्ता स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुण्यातील विभागीय स्तरावरील वसतिगृहांच्या प्रश्नावर देखील संघटनेने अनेक वर्षे आंदोलन केले. मंजूर असूनही प्रत्यक्ष सुरू न झालेली तीन वसतिगृह युनिट्स अखेर सुरू करण्यात आली. या उपक्रमामुळे सध्या एकूण ५५५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यानंतर देखील अजूनही अनेक मागण्या अपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्टेशनरी, शैक्षणिक साधनसामग्री यामध्ये वाढ करणे, तसेच ओबीसी आणि एसटी वसतिगृहांमध्ये एससी विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवणे हे तातडीने सोडविण्यासारखे प्रश्न आहेत. आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्यातील ४४३ पेक्षा अधिक शासकीय वसतिगृहांच्या सुधारणांसाठी सतत काम करत आहे.