दिसपूर, २९ ऑगस्ट. राहुल गांधी यांनी द्वेषाच्या राजकारणाची सुरुवात केली आहे. तुम्ही जितके अपशब्द मोदींसाठी वापराल, तितकं कमळ अधिक उंच फुलत जाईल”, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या अपशब्दांची तीव्र शब्दांत निंदा केली. अमित शहा सध्या आसामच्या दौर्यावर आहेत. आज, शुक्रवारी त्यांनी गुवाहाटी येथील राजभवनाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रह्मपुत्र युनिटचे उद्घाटन केले यावेळी ते बोलत होते.
अमित शहा म्हणाले, “या मंचावरून राहुल गांधींनी ज्या प्रकारे द्वेषाच्या नीच स्तराची सुरुवात केली आहे आणि पंतप्रधान मोदींच्या आईविषयी वापरलेले अपशब्द यांची मी मनापासून निंदा करतो. हा द्वेषपूर्ण राजकारण राहुल गांधींच्या सार्वजनिक जीवनाला अधःपाताच्या दिशेने घेऊन जाईल. पंतप्रधान मोदी जेव्हापासून सत्तेवर आले, तेव्हापासून सोनिया गांधी आणि इतरांनी काय काय नाही बोललं? अशा प्रकारच्या भाषेने तुम्हाला जनतेचा पाठिंबा मिळेल का? पुन्हा पुन्हा पराभव होत असूनही यांना समजत नाही.” शहा यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “तुम्ही जितके पंतप्रधान मोदींना अपशब्द बोलाल, तितकं कमळ अधिक बहरून फुलेल. जर कोणी राजकारणाला प्रदूषित करत असेल, तर देश कसा सुरक्षित राहील? संपूर्ण देश आश्चर्यचकित होऊन हे कृत्य पाहत आहे. सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. देशासाठी त्यांना माफी मागायला हवी आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.”
अमित शहा म्हणाले, “जेव्हा पूर्वोत्तर आणि आसामचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पंतप्रधान मोदींचे हे ११ वर्षे सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. आज आसाममध्ये वेगाने विकास होत आहे. आसामचा विकास कायम राहील. आपण इंग्रजांनी बनवलेले अनेक जुने कायदे रद्द केले आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळतो आहे. या ११ वर्षांत मोदींनी देशाच्या सुरक्षेसाठी मूलगामी काम केले आहे.”