अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीमध्ये शिवसेना (उबाठा) च्या विभागीय निर्धार मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सावंत यांनी मोदी सरकारच्या अपयशांची यादी मांडली. १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन, कर्जमाफी, महागाई नियंत्रण आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात आमदार नितीन बापू देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना भगव्याच्या आत दडलेले सैतान असे संबोधले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमाला वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख, आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार संजय दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
माजी मंत्री अशोक शिंदे, माजी खासदार अनंत गुढे, उपनेते सुधीर सूर्यवंशी आणि तीन जिल्ह्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते.सावंत यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. सरकार राज्यांमधील सत्तापालट करण्यात अधिक रस घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अयोध्येतील निवडणुकीत भाजपला अपयश आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मेळाव्याचे संचालन जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृती करणार आहे. पक्षाने 2 मे रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमरावतीत झालेल्या विभागीय निर्धार मेळाव्यात या मोर्चाची घोषणा केली. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाने 5 हजार गावांमध्ये निर्धार सभा घेण्याचे नियोजन केले आहे. या मोर्चात सुमारे 5 लाख शेतकरी सहभागी होतील असा अंदाज आहे.