अमरावती, 16 मार्च (हिं.स.)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा २०२५-२६ चा २५५.७२ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एच. नागरे यांनी हा अर्थसंकल्प अधिसभेमध्ये सादर केला. अर्थसंकल्पात १९२.३६ कोटी रुपये प्राप्तीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ६३.३६ कोटी रुपयाची तूट यामध्ये दर्शविण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व सर्व अधिसभा सदस्य उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प २०२५-२६ एकून तीन भागांमध्ये विभागलेला आहे. परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प, योजना, सहयोग कार्यक्रम अनुदान यानुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये परिरक्षणासाठी १८७.४० कोटी, विकासाकरिता ३६.८५ कोटी, स्वतंत्र प्रकल्प योजनांकरिता ३१.४७ कोटी रुपयाची तरतूद आहे. विद्यापीठाला केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून अनुदान व विविध शुल्क प्राप्त होत असते.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात वेतन आणि भत्त्याच्या तरतुदीत ५५ कोटी रुपयांची घट केली आहे. परीक्षा सुधारणासाठी नऊ कोटी रुपये आणि प्रशिक्षण, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, संशोधन इत्यादींसाठी ८७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य केंद्रातील औषधोपचारांसाठी ७ लाख ३० हजारांची तरतूद केली आहे. विद्यापीठ स्तरावरील संशोधन निधी योजनेसाठी ५० लाख आणि आर.जी.एस.टी.सी. अंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नेट कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे.