अमरावती, 7 जून (हिं.स.) गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवून एका २६ वर्षीय महिलेची तब्बल २५ लाख ५३ हजार ४३८ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बेनोडा पोलिस स्टेशन हद्दीत घडली. महिलेच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
महिला बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून, तिच्याशी सोशल मीडियावर ‘जसमित सिंग’ नामक व्यक्तीने संपर्क साधला. त्याने स्वतःला ‘न्यूझीलंड गोल्ड मर्चेंट्स लिमिटेड’ या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून ‘गोगोल्ड’ नावाची लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक करताच तिला ‘वैष्णवी सोनार’ नावाचे एक ऑनलाईन गुंतवणूक खाते उघडून देण्यात आले. यानंतर आरोपीने ‘फायनान्स अॅडव्हायजर’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सतत कॉल व मेसेज करून अधिक रिफंड मिळेल, असा विश्वास निर्माण केला. त्याला बळी पडून महिलेने विविध ऑनलाईन माध्यमांतून एकूण २५.५३ लाख रुपये गुंतवले. प्रारंभी काही काळ तिला नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, रक्कम ट्रान्सफर वा विड्रॉल होत नसल्याचे लक्षात येताच तिने चौकशी केली.
त्यावेळी आणखी पैसे भरल्यास रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. महिलेला फसवणुकीची जाणीव होताच महिलेने बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक वाढत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.