अमरावती – आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील बल्लीकुर्वा येथील सत्यकृष्ण ग्रॅनाइट खाणीत झालेल्या मोठ्या अपघातात ओडिशातील सहा कामगारांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीतील खडकाचा मोठा भाग अचानक कोसळल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी खाणीत एकूण १६ कामगार होते. जखमींना नरसारावपेट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
