परभणी, 6 सप्टेंबर।
पाथरी-माजलगाव रोडवरील पोखरणी फाटा परिसरात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा कंटेनर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. या कारवाईत 26 जनावरांची सुटका करण्यात आली असून तब्बल 44 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रेणापुर येथील काही नागरिकांना संशयास्पद कंटेनर दिसल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला. पोखर्णी फाटा येथे कंटेनर थांबवून पाहणी केली असता त्यात क्षमतेपेक्षा जास्त, संपूर्ण बंद अवस्थेत 26 जनावरे आढळून आली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर कंटेनर पाथरी पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मरळ यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंटेनर चालक शेख सगीर शेख शब्बीर (वय 42) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. गोवंशावर कत्तलीसाठी बंदी असतानाही व सध्या ऐन सणासुदीच्या दिवसांत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.