नाशिक, 30 जून (हिं.स.)।
नाशिकमध्ये महायुतीत एकमेकाला शह देण्याचं राजकारण सुरू झाले असून आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन भाजपाने शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून येत्या बुधवार 2 जुलै रोजी मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी 12 वा. डॉ. अपूर्व हिरे यांचा आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिका-यांसह पक्ष प्रवेश सोहळा निश्चित करण्यात आला आहे.
नुकतेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी थेट दुरध्वनीकरून डॉ. अपूर्व हिरे यांना पक्षात अधिकृत प्रवेशासाठी आमंत्रित केलेले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा देखील झाली असून त्यांनतर पक्षात अधिकृत प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमंत्रण व आपल्या ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सांगितले. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातून तसेच नाशिक शहरातून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना यामुळे भाजपाकडून एक प्रकारे शह देण्याचा प्रकार झाल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणामध्ये रंगत असून हिरे घराण्यामध्ये आतापर्यंत व्यंकटराव हिरे पुष्पाताई हिरे आणि प्रशांत हिरे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान घेतलेले आहे. त्या माध्यमातून एक आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. यापैकी व्यंकटराव हिरे आणि पुष्पाताई हिरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यामुळे अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाला अतिशय महत्त्व निर्माण झालेले आहे.