मुंबई, 6 सप्टेंबर। गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत 400 किलो आरडीएक्सचा वापर करून भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अश्विन कुमार सुप्रा (वय 50) याला उत्तर प्रदेशातील नोएडामधून अटक करण्यात आली असून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुरुवारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या धमकीच्या संदेशामुळे शहरात खळबळ उडाली होती.
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत शिरले असून 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब आणि आरडीएक्स लपवण्यात आले आहे. या स्फोटांत जवळपास 1 कोटी लोक मृत्युमुखी पडू शकतात, असा दावा करत ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता.
धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलिस, अँटी टेरर स्क्वॉड (एटीएस), सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली. गणपती विसर्जनाचे मार्ग, रेल्वे स्थानके, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने नाकाबंदी, गस्त आणि तपासणी अधिक कडक करण्यात आली.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या धमकीमागचा सूत्रधार अवघ्या काही तासांत शोधून काढला. आरोपी अश्विन कुमार सुप्रा (वय 50) हा आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास होता. धमकीचा मेसेज पाठवण्यासाठी त्याने वापरलेला मोबाइल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे.
या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351 तसेच उपक्रम 2, 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले तरी आरोपीने खोडसाळपणा करून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
