पॅरिस, 10 सप्टेंबर। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही मोठा गोंधळ सुरू झाला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. राजधानी पॅरिसमध्ये बुधवार (१० सप्टेंबर) रोजी आगीच्या आणि तोडफोडच्या अनेक घटना घडल्या आहेत. अहवालानुसार, फ्रान्समधील आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले, कचरापेट्या पेटवून दिल्या आणि पोलीसांशी झडपाही झाली.
फ्रान्समधील लोक राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की, मॅक्रों सरकारने सामान्य जनतेसाठी काहीच केलेले नाही.लोकांना जीवनमान सुधारण्याची अपेक्षा आहे, पण वाईट आर्थिक व्यवस्थापनामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे.सरकारच्या प्रस्तावित बजेट कपातीमुळेही लोकांमध्ये रोष आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभरात सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे. आंदोलकांनी रस्ते अडवले आहेत, आणि काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.सध्या फ्रान्स पूर्णपणे बंद झालेला नाही, पण काही भागात पोलीस व आंदोलकांमध्ये झडपाही झाली आहे आणि दर्जनभर आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच फ्रान्सच्या संसदेनं पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांना अविश्वास ठरावाद्वारे हटवले होते, कारण ते देशाच्या वाढत्या कर्जावर नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी ठरले.यानंतर ९ सप्टेंबर रोजी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी सेबास्टियन लेकोर्नू यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.सेबास्टियन लेकोर्नू हे मूळचे उजव्या विचारसरणीचे राजकारणी आहेत, पण २०१७ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत त्यांनी मॅक्रों यांना पाठिंबा दिला होता.
सध्या फ्रान्समध्ये आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या फेऱ्यात अडकला आहे, आणि सामान्य जनतेत मोठा असंतोष पसरलेला आहे.