छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर समृद्धी महामार्गावर खिळे पडून अनेक वाहनांचे टायर फुटल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी दुपारी (एमएसआरडीसी) अधिकृत खुलासे वजा स्पष्टीकरण दिले आहे.
एमएसआरडीसीच्या निवेदनानुसार, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील (साखळी क्र. ४४८+६४०) ठिकाणी सुमारे १५ मीटर लांबीच्या भागात सूक्ष्म तडे (Minor Cracks) पडले होते. या तड्यांवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्ती दरम्यान ‘अॅल्युमिनियम’चे नोझल्स वापरले गेले होते.
काम सुरू असताना वाहतूक वळविण्यात आली होती. काही वाहनांचे टायर पंचर झाल्याची घटना घडली. त्यानंतर घटनास्थळी पाठविण्यात आलेल्या रस्ते पथकाने (RPV) १२.३६ वाजता जागेवर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
एमएसआरडीसीने स्पष्ट केले की, या प्रकारामुळे कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर अपघात झाला नाही. तसेच Epoxy Grouting साठी वापरलेले Aluminium नोझल्स पूर्णपणे काढून टाकण्यात आले असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे.
संस्था व पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने ‘ट्रॅफिक डायव्हर्जन’ व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.
