इस्लामाबाद, ७ ऑगस्ट – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते यूएस सेंट्रल कमांडचे (CENTCOM) कमांडर जनरल मायकेल ई. कुरिल्ला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी फ्लोरिडामधील टाम्पा येथे जातील, जिथे सेंटकॉमचे मुख्यालय आहे.
या दौऱ्यामुळे इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील संबंध अधिक दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, ट्रम्प प्रशासनाच्या भारतविरोधी टॅरिफ धोरणांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याउलट ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत व्यापार करार केले असून, फक्त १९ टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानमधील तेल साठ्यांचा शोध घेण्याची योजना आखण्यात आली आहे.
याआधी १८ जून रोजी जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये लंच केला होता. ही भेट विशेष होती कारण यामध्ये कोणताही नागरी अधिकारी उपस्थित नव्हता. ही चर्चा कॅबिनेट रूममध्ये झाली होती आणि प्रसारमाध्यमांना परवानगी नव्हती.
या बैठकीदरम्यान ट्रम्प आणि मुनीर यांच्यात व्यापार, आर्थिक विकास, क्रिप्टोकरन्सी आणि भारत-पाकिस्तानमधील तणावावर चर्चा झाली. ट्रम्प यांनी मुनीर यांचे युद्ध टाळल्याबद्दल आणि संघर्ष शांततेने संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी त्यांना युद्ध न करण्याबद्दल आणि संघर्ष संपवल्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो.”
या भेटीनंतर मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्याची मागणीही केली होती. विशेष म्हणजे, ट्रम्प हे भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानी डीजीएमओने विनंती केल्यानंतरच शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता.