वॉशिंगटन , 4 जून (हिं.स.) : भारतीय अंतराळ मोहिमेसाठी उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या देशवासीयांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील उड्डाण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता हे ऐतिहासिक उड्डाण १० जून रोजी संध्याकाळी ५:५२ वाजता (आयएसटी) पार पडणार आहे. या मोहिमेचा भाग असलेली Ax-4 अंतराळ मोहीम ही अमेरिकेतील Axiom Space कंपनीद्वारे आयोजित करण्यात आली आहे. सुरुवातीला ही मोहीम २९ मे रोजी, नंतर ८ जूनला ठरवण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक बदल, मोहिमेसंदर्भातील नियोजन आणि अंतराळवीरांच्या वैद्यकीय प्रक्रियेमुळे ही तारीख आता १० जून करण्यात आली आहे.
या विलंबानंतर बोलताना शुभांशू शुक्ला म्हणाले, “मी केवळ तांत्रिक उपकरणेच घेऊन जात नाही, तर १७० कोटी भारतीयांचे स्वप्न, आशा आणि आकांक्षा घेऊन जात आहे. मी अंतराळात सात वैज्ञानिक प्रयोग करणार असून, ते माणसाच्या सूक्ष्मगुरुत्वाकर्षणातील वर्तनावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकतील.” ते पुढे म्हणाले, “मी स्वतःला पृथ्वी आणि अंतराळ यांच्यामधील एक सेतू समजतो. या मोहिमेसोबत मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या रचनांची काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतीकेही घेऊन चाललो आहे जी भारताच्या सर्जनशीलतेचा आणि नवोन्मेषाचा अभिमान आहे.” शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत.
त्याआधी १९८४ साली राकेश शर्मा हे पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर म्हणून अंतराळात गेले होते. त्यामुळे शुक्ला यांची ही मोहीम भारतासाठी केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही, तर भावनिक आणि राष्ट्रीय अभिमानाचा क्षण आहे.या Ax-4 मोहिमेत शुक्ला हे पायलट म्हणून काम पाहतील. त्यांच्या सोबत असणार आहेत पेगी व्हिटसन (नासाची अनुभवी अंतराळवीर आणि मोहिमेच्या प्रमुख), तसेच पोलंडचे स्लावोस उजनांस्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर कापू, जे त्यांच्या देशाचे पहिले अंतराळवीर ठरणार आहेत. या मोहिमेपूर्वी सर्व अंतराळवीरांना २५ मेपासून दोन आठवड्यांच्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
केनेडी स्पेस सेंटरमध्ये हे “आरोग्य स्थिरीकरण प्रोटोकॉल” अंतर्गत होते. यामध्ये अत्यंत स्वच्छतेची काळजी, वैद्यकीय निरीक्षण, आणि बाह्य संपर्कावर कडक निर्बंध असतात. कारण, आयएसएस ही पूर्णपणे बंद प्रणाली असल्याने तिथे लहानशीही संसर्गजन्य आजार गंभीर परिणाम घडवू शकतो. शुक्ला यांनी आपल्या देशवासीयांना उद्देशून म्हटलं, “ही मोहीम भारतासाठी एक मैलाचा दगड आहे. कृपया या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करा. तारे सुद्धा गाठता येतात… जय हिंद!” ही मोहीम केवळ वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक नसून, ती भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरूवात ठरू शकते. आता अवघ्या काही दिवसांत, भारतीय इतिहासातील आणखी एक गौरवशाली पान लिहिले जाणार आहे.