मुंबई, १ जुलै (हिं.स.) – अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांना विधानसभेतून एक दिवसाकरता निलंबित करण्यात आले आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला.
आज, मंगळवारी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नांचा तास झाल्यावर पटोले यांनी कृषीमंत्री आणि अन्य मंत्री शेतकर्यांविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकर्यांची क्षमायाचना करावी, अशी मागणी सभागृहात केली. या वेळी अध्यक्षांच्या स्थानापर्यंत जाऊन पटोले यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. या वेळी नाना पटोले यांच्या समवेत विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, अमीन पटेल आदी सदस्य अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. या वेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी उभे राहून नाना पटोले यांच्या मागणीला पाठींबा दिला.
दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदारही सभागृहाच्या मोकळ्या जागेत आले. सभागृहात गोंधळाची स्थिती झाल्याने अध्यक्षांनी ५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा चालू झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांची क्षमायाचना करण्याची मागणी लावून धरली. या वेळी नाना पटोले पुन्हा अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना ‘तुम्ही विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले असतांना तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला कारवाई करण्यास प्रवृत्त करू नका’, असा इशारा दिला. त्यानंतरही पटोले अध्यक्षांच्या आसनाजवळ थांबले आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकर्यांविषयी भावना व्यक्त करणे चुकीचे नाही; परंतु अध्यक्षांवर धावून जाणे योग्य नाही. याविषयी नाना पटोले यांनीच क्षमा मागावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतरही नाना पटोले काही वेळ सभागृहात होते. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नाना पटोले सभागृहाच्या बाहेर गेले. सोबतच विरोधकांनीही सरकारचा निषेध करत सभात्याग केला.