सोलापूर : पत्नी माझ्या सोबत राहत नाही म्हणून पतीने कंबर तलाव येथे उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रविवारी (१२ डिसेंबर) रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कंबर तलाव विजापूर रोड सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत जगन्नाथ अंगुले यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रवीण नंदकिशोर वाघमारे (रा.हनुमान मंदिरासमोर,विजापूर नाका नं १ झोपडपट्टी सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रात्रगस्त करीत असताना त्यांना पोलीस स्टेशन वरून कळविण्यात आले की एक इसम कंबर तलाव येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ कंबर तलाव येथे गेले असता प्रवीण वाघमारे हा कंबर तलाव येथे पाण्यात पुढे चालत जात असताना दिसून आला. त्याला बाहेर येण्यास सांगितले असता, प्रवीण वाघमारे हा मला मरायचे आहे, माझी पत्नी माझ्यासोबत राहण्यास तयार नाही म्हणून ओरडत होता.
त्यावेळी फिर्यादी यांनी प्रवीण वाघमारे यांना समजावून सांगून बाहेर काढले.त्यावेळी प्रवीण वाघमारे म्हणाला की, माझे पत्नी बरोबर भांडण झाले आहे. ती माझ्या सोबत राहत नसल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक लोंढे हे करीत आहेत.
* विवाहितेचा विनयभंग करून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : अकलूज परिसरात एका महिलेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील अकलूजच्या पोलिसांनी दयानंद जगन्नाथ भोसले आणि त्याचा भाऊ चैतन्य भोसले (दोघे रा. कोंढरपट्टा, अकलूज) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ती विवाहिता दुपारी घराजवळ काम करीत होती. तेव्हा दयानंद भोसले हा तिच्याजवळ येऊन असभ्य वर्तन करू लागला. त्यावेळी महिलेने आरडाओरड केली तेव्हा तिचा पती घटनास्थळी आला. त्यावेळी दयानंद आणि त्याचा भाऊ चैतन्य या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुम्हाला बघून घेण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद अकलूज पोलीस झाली. हवालदार चंदनशिवे पुढील तपास करीत आहेत.
* लग्नाचे टेन्शन घेऊन ऊस तोड मजुराने केले विष प्राशन
सोलापूर : माझ्यासोबत लग्न कर असा तगादा तरुणीने केला. त्याचा टेन्शन घेऊन एका ऊसतोड मजुराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सांगवी ( ता. तुळजापूर) येथे मगर यांच्या शेतात रविवारी (ता.१२ ) सकाळच्या सुमारास घडली.
विशाल विकास जाधव (वय २३ रा. पुसद जि. यवतमाळ) असे विष प्राशन केलेल्या मजुराचे नाव. आहे तो आपल्या गावातील टोळीसह सांगवी येथे ऊसतोड करण्यासाठी आला होता. त्याच्या टोळीतील एका तरुणीने माझ्यासोबत लग्न कर म्हणून नेहमी सांगत होती. त्याच्या मनस्ताप करून घेऊन त्याने सकाळी पिकावर फवारणीचे विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सदरबाजार पोलिसात झाली आहे .
* शाळेतील कर्मचाऱ्यास मारहाण करून गळ्यातील लाकेट काढले; मुख्याध्यापकास सह दोघांवर गुन्हा
सोलापूर – पगार बिलावर सही करण्यास नकार देत शाळेतील प्रयोग सहाय्यकास काठीने मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह दोघांविरुध्द वळसंगच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास मुस्ती ( ता. दक्षिण सोलापूर) येथील विशाल पाटील यांच्या शेतात घडली.
यासंदर्भात विशाल प्रताप पाटील (वय ३९) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. विशाल पाटील हे मुस्ती येथील बसवेश्वर विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी शनिवारी दुपारी पगार बिलावर सही करण्यासाठी मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी बिलावर सही देत नाही. तू विलास पाटील यांच्या शेतात चल असे म्हणून सांगितले.
त्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्याध्यापक अविनाश पाटील आणि त्यांचा भाऊ गणेश अशोक पाटील यांनी तुझा पगार बिलावर आम्ही सही देत नाही. तुला कामावरून काढून टाकतो. तसेच तुझ्या वडिलांना संचालक पदावरून काढून टाकतो. तुम्ही दोघे नेहमी संस्थेला अडचणीत आणता. असे म्हणत दोघांनी त्याला काठीने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील गणेश पाटील याने सोन्याची चेन काढून घेतली, असे अविनाश पाटील या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीत नमूद आहे. फौजदार स्वामीराव पाटील पुढील तपास करीत आहेत.