पाटणा, १८ ऑगस्ट – बिहारच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती देणारा औंटा ते सिमरिया महासेतू पूर्णपणे तयार झाला असून, याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. मोकामा येथील औंट घाट आणि बेगूसरायच्या सिमरियाला जोडणारा हा ६ लेनचा पूल विकसित होत असलेल्या बिहारचे प्रतीक ठरणार आहे.
हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून पूर्वोत्तर राज्यांशी संपर्क अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. याचा लाभ केवळ बेगूसरायलाच नव्हे, तर संपूर्ण बिहार आणि देशाला होणार असून उद्योग-व्यवसायालाही चालना मिळेल.
या प्रकल्पाची किंमत १८७१ कोटी रुपये असून गंगा नदीवरील या पुलाची लांबी १.८६५ किमी आहे. अॅप्रोच रोडसह एकूण लांबी ८.१५० किमी आहे. यामुळे उत्तर व दक्षिण बिहारमधील जोडणीत ऐतिहासिक बदल होणार आहे.
याआधी मोकामा-सिमरिया दरम्यान केवळ एकच २ लेनचा राजेंद्र सेतू होता, जो १९५९ मध्ये सुरू झाला होता. वाढत्या वाहतुकीमुळे नव्या पुलाची गरज भासत होती. २०१५ मध्ये मोदी सरकारच्या विशेष पॅकेजअंतर्गत या सेतूचे काम हाती घेण्यात आले होते. २०१७ मध्ये याची पायाभरणी झाली आणि सुमारे दहा वर्षांनंतर ते पूर्ण झाले.
याच दिवशी बख्तियारपूर- मोकामा दरम्यानचा ४ लेन रस्ताही सुरू होणार आहे. ४४.६० किमी लांबीच्या या रस्त्याची किंमत १८९९ कोटी रुपये आहे. या कामामुळे पटना ते पूर्णिया दरम्यानचा महामार्ग आणखी सक्षम होणार आहे.