कॅनबेरा, 11 ऑगस्ट –
डार्विन येथे झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयात टिम डेव्हिडच्या दमदार फलंदाजीचा मोठा वाटा होता.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावा ठोकल्या, ज्यात ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर, डेव्हिड हसी, मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सहा षटकारांचा टप्पा गाठला होता.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ २० षटकांत ९ बाद १६१ धावांवर थांबला. रायन रिकेल्टनने सर्वाधिक ७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि बेन द्वारशीस यांनी प्रत्येकी ३, अॅडम जम्पाने २ आणि ग्लेन मॅक्सवेलने १ विकेट घेतली.