सोलापूर, 18 ऑगस्ट – डीजेमुक्त सोलापूरसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून यंदापासून डीजे न वापरणाऱ्या गणेश मंडळांना स्वतंत्र बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली आहे.
डिजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोंडा यांनी सांगितले की, शहरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये पारंपरिक खेळ, आकर्षक देखावे आणि सामाजिक प्रबोधनाचे संदेश सादर केले जातात, ज्यामुळे संस्कृतीचे दर्शन घडते.
मात्र, काही काळापासून मिरवणुकांमध्ये डीजेच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो आहे. सातत्याने मोठ्या आवाजाचा परिणाम आरोग्यावर होत असून बधिरपणाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना मिरवणुकीचा आनंद घेण्याऐवजी आवाजामुळे घरी परतण्याची वेळ येते, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.