चंदीगड, ५ ऑगस्ट – रोहतक येथील सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा ४० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. मंगळवारी सकाळी त्याला कडक पोलिस बंदोबस्तात सिरसा येथील डेरा मुख्यालयात हलविण्यात आले. ही त्याची १४ वी वेळ आहे की तो तात्पुरता तुरुंगातून बाहेर आला आहे. यापूर्वी ९ एप्रिल २०२५ रोजी त्याला २१ दिवसांची फर्लो मंजूर झाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या १५ ऑगस्टला राम रहीमचा वाढदिवस असून, त्याच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधननंतर डेरामध्ये वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तो २०१७ पासून दोन साध्वींच्या लैंगिक शोषण आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.
गुरमीत राम रहीमची सुटका नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे, विशेषतः हरियाणा, पंजाब, राजस्थान व दिल्लीतील निवडणुकांच्या काळात. २०२४ मध्ये त्याला तीन वेळा आणि २०२३ मध्येही तीन वेळा जेलबाहेर येण्याची संधी मिळाली होती. या सर्व सुटकेच्या वेळी सामाजिक किंवा निवडणूक संदर्भ असलेल्या घडामोडी घडत होत्या.
२०२५ मध्ये राम रहीम तिसऱ्यांदा जेलबाहेर आला आहे. याआधी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये प्रत्येकी २१ दिवसांची फर्लो मिळाली होती. पॅरोल आणि फर्लो न्यायालयीन प्रक्रियेनुसार देण्यात येतात. पॅरोलचा कालावधी शिक्षेमध्ये धरला जात नाही, तर फर्लोचा कालावधी शिक्षेमध्ये समाविष्ट केला जातो.