पुणे : क्रिकेट खेळता – खेळता हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा मृत्यू झाला आहे. बाबू नलावडे असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे. ओझर संघ व जांबुत संघ यांच्यात सामना सुरू होता. तेव्हा ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू बाबू नलावडे नॉन स्ट्राईकला होता. अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तो खाली कोसळला. रूग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरू आहेत. आज दुपारी ओझर संघ व जांबुत संघ हा सामना चालू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू व कॅटवे ओतुर संघाचा एक माजी खेळाडू धोलवड (ता.जुन्नर ) गावचा बाबू नलावडे वय वर्ष 47 हा फलंदाजी करत असताना अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अगदी काही क्षणात इतर खेळाडूंनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील डॉ.राऊत यांच्याकडे हलवले. पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे. एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर दुःखद निधन होणे यामुळे तालुक्यात व क्रिकेट प्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अलिकडील काळात जीवनशैली आणि आहारात झालेल्या बदलामुळे वरकरणी माणूस कितीही फिट वाटत असला तरीही त्याच्यासोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटर म्हटलं की फिटनेस ही गोष्ट आलीच. मात्र असं असतानाही हृदयविकाराचा झटका येऊन होणाऱ्या खेळाडूंच्या मृत्यूंच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.