महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आमदारांचा हल्ला
अमरावती – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ असे संबोधल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली.
कडू म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणं म्हणजे त्यांच्या दुःखाचा अपमान आहे. सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या विधवांच्या डोळ्यातील अश्रू रस्त्यावर वाहत आहेत. त्यांना ‘नाटकी’ म्हणणं ही निर्लज्जता आहे. बावनकुळे मंत्री झाले म्हणून त्यांचं पोट भरलं असेल, पण त्यांना शेतकऱ्यांची वेदना कळत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना शिव्या देणं बंद करावं. सरकारी मदत हा आमचा हक्क आहे, ती कुणाच्या खिशातून आलेली नाही.”
कडू यांनी कालच्या शासकीय कार्यक्रमावरही निशाणा साधला. “शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण देणं निंदनीय आहे. राजकीय भाषण करायचं असेल, तर स्वतःची सभा घ्या आणि स्वतःचा खर्च करा. अन्यथा तुम्ही ‘महामूर्ख’ आहात,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
त्यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवरही टीका केली की, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात स्थानिक आमदारालाही बोलू दिले नाही, तसेच संत्रा उत्पादकांच्या समस्यांवर एकही शब्द काढला नाही. “तुम्ही सातबाऱ्यावर नाव कोरण्याचं जे नाटक केलं होतं, तीच खरी नौटंकी होती. आमच्यावर बोलण्याआधी स्वतःच्या वागणुकीचा आरसा पहा,” असे कडू यांनी म्हटले.
बच्चू कडू यांच्या या बिनधास्त प्रतिक्रियेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली असून, आता बावनकुळे यांचा प्रतिसाद काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
