अकोला, 10 जुलै (हिं.स.)।
मुख्यमंत्री विदर्भाचा आहे पण काही कामाचा नाही कारण विदर्भातील शेतकऱ्यांना हा मुख्यमंत्री शेतीला वेळेवरती वीज देत नाही. सध्या रानातली पिके करपून जात आहेत. रात्री-अपरात्री केव्हाही लाईट येते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असेल तर मग हा विदर्भातील मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या काय कामाचा? असा सवाल करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता शेतकऱ्यांनी 14 तारखेला अंभोरा येथे रूमनं आणि लाठ्या काठ्या हातात घेऊन रस्त्यावर उतरा आणि सभेला या, असे आवाहन देखील कडू यांनी ग्रामस्थांना केले.
‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून ही यात्रा दारवा तालुक्यातील तळेगाव या गावात आज पोहचली. यावेळी बच्चू कडू यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तो पर्यंत आपला लढा चालू राहणार आहे. शेतकरी हो हि सरकार नावाची व्यवस्था तुमच्या मेहनतीचा पैसा खात आहे आणि तुमच्या आपापसामध्ये जातीच्या धर्माच्या नावाखाली भांडणे लावून देत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांच्या कधीच नादी लागू नका. आपली लढाई ही शेतीमालाला भाव मिळण्याची आहे, या लढाईत तुम्ही सहभागी झाला पाहिजे. ही भूमी वसंतराव नाईक यांची आहे. या भूमीने राज्यात हरित क्रांती आणली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सातबारा सुद्धा याच भूमीतुन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.