Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाळासाहेब : एक लेणे… एक देणे!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

बाळासाहेब : एक लेणे… एक देणे!

Surajya Digital
Last updated: 2020/11/17 at 8:12 AM
Surajya Digital
Share
20 Min Read
SHARE

दिवाळी नुकतीच सरलेली आणि नको नकोशी वाटणारी ती बातमी कानावर येऊन आदळलीच. ‘बाळासाहेब गेले!’ दोन शब्दांचा तो निरोप विजेच्या गतीने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आणि दिवाळीतच मिणमिणते होत राहिलेले दिवे पार विझूनच गेले. केवळ मराठी मनावर नव्हे, तर अखंड भारतावर जणु काजळी पसरली. सर्वत्र अंध:काराचे साम्राज्य स्थापन झाले, असे वाटू लागले. जग होत्याचे नव्हते झाले.

रात्र होईपर्यंत वांद्र्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर हजारोंची गर्दी झाली. उद्याचा सूर्य उगवूच नये, असेच साऱ्यांना वाटत होते. पण सृष्टीच्या नियमानुसार दिवस उजाडला आणि सकाळीच बाळासाहेबांची अंतीम यात्रा सुरू झाली.

अशी अंत्ययात्रा उभ्या जगाने क्वचितच अनुभवली असेल. एकाच वेळी 17 लाख लोक त्या एका महामानवाचे अखेरचे दर्शन डोळ्यात साठवण्यासाठी धडपडत होते. ही महायात्रा बाळासाहेबांच्या लाडक्या शिवतीर्थावर पोहोचली, तेव्हा सूर्यसुद्धा क्षीतीजाच्या आडोशाला जाऊ पाहात होता.

अखेर दिवेलागण होता होता ज्या पवित्र भूमीवर 46 वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरेंनी आपला ‘बाळ महाराष्ट्राच्या सेवेत जाहीरपणे रुजू केला, त्याचे पार्थिव पचंमहाभूतांच्या स्वाधीन झाले.

सरणाच्या ज्वाळा धडधडत आकाशाला भिडू लागल्या. ‘परत या, परत या, बाळासाहेब परत या’ हा लाखो चाहत्यांचा आक्रोश होता. पण त्याला न जुमानता बाळासाहेब निघून गेले होते.
एक युगान्त झाला होता.

गेल्या शतकाने चीनमध्ये माओ-त्से’ तुंग, रशियात लेनीन, भारतात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या प्रचंड अंत्ययात्रा पाहिल्या होत्या. त्याच तोडीचा हा प्रसंग. अंत्ययात्रा वांद्र्यापासून सहा किलोमीटर्सवरील शिवाजी पार्कपर्यंत पोहोचण्यास आठ तास लागले. कारण या प्रत्येक फुटावर बाळासाहेबांच्या पाऊलखुणा त्यांच्या लाखो चाहत्यांना स्पष्ट दिसत होत्या. केवळ एका माणसाची शेहेचाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतली ही कमाई.

शिडशिडीत शरीरयष्टीच्या पावणे सहा फूट उंचीच्या या मध्यमवर्गीय माणसामध्ये अशी काय जादू होती? ते कळण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नजर टाकणे गरजेचे आहे.

1960च्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 105 हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागाचे चीज झाले. भारताच्या नकाशावर एका नव्या राज्याचे नाव कोरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजाचे मऱ्हाटी राज्य आणि पेशवाई यांच्या अस्तानंतर प्रथमच मराठी संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्त्व कायदेशीररित्या मान्य झाले. समस्त मराठी सामजाने केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे कट नेस्तनाबूत झाले आणि मुंबई महाराष्ट्राची झाली. महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबईत आल्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, त्यामुळे मराठी मनाला नवा मोहोर फुलला.

हे सारे झाले खरे, पण त्याची फळे काही मराठी माणसाच्या पदरात पडली नाहीत. मुंबई महाराष्ट्रात आली पण मुंबईतून मराठी माणसालाच हद्दपार करण्याचे कट महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच शिजू लागले. मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी बनली नाही, तर एव्हाना ती देशाची आर्थिक राजधानी झालेली होती. मुंबईच्या गिरण्या, औद्योगिक कारखाने, रासायनिक फॅक्टरीज, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुख्य म्हणजे ऐतिहासिक महत्त्व लाभलेली गोदी यामुळे मुंबईकडे अवघ्या देशाचे लक्ष होते.

त्यामुळेच मुंबई परप्रांतियांचे ‘लक्ष्य’ही बनली. देशाच्या सर्व भागांतून मुंबईकडे रस्ते दुथडी भरून वाहू लागले. त्यात उत्तर हिंदुस्थानी, शेजारच्या राज्यातील गुजराती होतेच, शिवाय मराठी माणसाच्या नोकरीवरच घाला घालणारे दाक्षिणात्य मोठ्या प्रमाणावर मुंबईत घुसू लागले. मुंबईच्या खाजगी नोकऱ्यांबरोबरच सरकारी, निम-सरकारी आस्थापनांमध्येही केवळ दाक्षिणात्यच दिसू लागले. बँकांच्या काऊंटरवर मद्रासी, रेल्वेच्या बुकिंग खिडकीत मद्रासी आणि मंत्रालयाच्या केबिनमध्येही मद्रासीच.
मराठी माणसाने करायचे काय?

सरकारी नोकरी पेशातील दक्षिणी हल्ल्याचे परिणाम मुंबईच्या सामाजिक व सांस्कतिक जगावरही दिसू लागले. माटुंग्याचे माटुंगम् कधी बनले ते कुणाला कळलेच नाही. चेंबूर, कुर्ला, भांडुप सर्वत्र दाक्षिणात्यांचे राज्य आले. घटकोपर, मालाड, बोरिवली ही उपनगरे गुजराती झाली, तर सांताक्रुझ, मुलुंड, ट्राँबे उत्तर भारतीयांचे मोहल्ले बनले. मराठी माणसाच्या मुंबईतून मराठी माणूस दूर, डोंबिवली, विरार, वसई, कल्याणला फेकला जाऊ लागला. त्याला सरकारी, निम-सरकारी नोकरी मिळेना. मराठी माणसाच्या पिछेहाटीबरोबर साहजिकच मराठी भाषेचीही पिछेहाट सुरू झाली.
मुंबईत सार्वजनिक व्यवहारातून मराठीचे उच्चाटन होऊ लागले.

हे होईपर्यंत पहिली पाच वर्षे उलटली होती. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नव्याची नवलाई उतरली होती. ‘मराठी’ राज्य मिळवल्याची झिंग आता मराठी मनातून उतरु लागली होती. मुंबईतला मराठी माणूस आतल्या आत रडत होता, कण्हत होता आणि संतापतही होता. पण हे सारे काही आतल्या आत. रस्त्यावर येऊन पुन्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती आणि ज्यांच्यात तशी हिंमत शिल्लक होती, त्यांना आपल्या सोबतीला कोणी येईल का, याची शाश्वती नव्हती. आतल्या आत धुमसणारे ज्वालामुखी तसेच थंड पडून होते. परप्रातियांचे लोढे मात्र घुसतच होते.

अशा निराशाजनक वातावरणात एक कलावंत आपल्या ब्रशच्या फटकाऱ्याने व्यंगचित्रे काढून भल्या भल्या नेत्यांची भंबेरी उडवत होता. पंडित नेहरूंपासून स. का. पाटलांपर्यंत आणि यशवंतराव चव्हाणांपासून व्ही. के. कृष्ण मेननपर्यंत साऱ्यांना या व्यंगचित्रकाराने सळो की पळे करून सोडले होते. या सडसडीत शरीरयष्टीच्या पण पोलादी काळीज लाभलेल्या कलावंताच्या ऊरात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग अद्याप धगधगत होते. संयुक्त महाराष्ट्र्राचा लढा या कलावंताने आपल्या घरातून अनुभवला होता. अन्यायाविरुद्ध झगडायचे, तर अथक लढा द्यावा लागतो आणि तो देताना सर्वस्वाची होळी करावी लागते, हे त्याने बालपणापासून अनुभवले होते.

मराठी माणसाला आता त्याच्या राज्याच्या राजधानीतच न्याय मिळवून द्यायचा तर त्यासाठी त्याची आणि फक्त त्याचीच चळवळ उभी राहायला हवी. त्याची स्वत:ची, हक्काची संघटना हवी, हे त्याने पक्के जाणले आणि त्याने कामाला सुरूवातही केली. हे सारे कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही राजकीय शक्ती वा व्यक्ती पाठीशी नसताना आणि पैशाची पाकिटेही फाटकीच असताना…

या कलावंताचेच नाव, श्रीमान बाळासाहेब! त्यांनी उभारलेल्या संघटनेचे नाव ‘शिवसेना!

शिवसेना या चार अक्षरांनी केवळ मुंबई आणि महाराष्ट्रात नव्हे, तर देशात इतिहास निर्माण केला. भारत हे संघराज्य असले आणि राज्य घटनेने सर्व भारतीयांना संचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असला, तरी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांच्या सरकारांची आणि तिथल्या स्थानिक समाजाची आहे, हे मूलभूत तत्त्व बाळासाहेबांनीच प्रथम समाजासमोर मांडले.

पुढे याच तत्त्वावर अनेक राज्यांत स्थानिक भूमिपुत्रांच्या चळवळी सुरू झाल्या व अनेक ठिकाणी त्या यशस्वीही झाल्या. त्यांची बिजे बाळासाहेबांनीच रुजवली. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी तामीळनाडूत अण्णा दुराई या कलावंतानेच द्रविड मुन्नेत्र कळघम ही द्राविडी लोकांची चळवळ सुरू करून पुढे सत्ताही ताब्यात घेतली होती. पण अण्णांची चळवळ वंशवादाची होती. बहुसंख्याक द्रविड समाजावर कुरघोडी करून तिथल्या अय्यर, अय्यंगार समाजाने मानाच्या व प्राप्तीच्या सरकारी जागा अडवल्या होत्या. अण्णांचा लढा त्यांच्याविरुद्ध होता. एका अर्थाने ही चळवळ तामिळी विरुद्ध तामिळी अशीच होती.

बाळासाहेबांचा पिंड वेगळा. त्यांनी जात-पात तोडून समस्त मराठी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आणि मराठी विरुद्ध अमराठी असा लढा पुकारला. ती काळाची गरज होती. ती बाळासाहेबांनी वेळीच ओळखली, हे बरे झाले. नाही तर पुढच्या दहा वर्षांतच मुंबईतून मराठी माणूस कायमचा हद्दपार झाला असता आणि काही दिवसांतच मुंबई महाराष्ट्रापासून दुरावली असती.

बाळासाहेबांचे हे कर्तृत्त्व व उपकार मराठी समाजाला केव्हाही विसरता येणार नाहीत. शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांने भर रस्त्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली, त्यानंतरच बँकांमध्ये 80 टक्के नोकऱ्या मराठी तरुणांना मिळू लागल्या. त्यापाठोपाठ एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, रेल्वे, गोद्या, विमा कंपन्या, सरकारी व निमसरकारी रुग्णालये आदी ठिकाणीही मराठी तरुणांनी मानाने आणि हक्काने प्रवेश मिळवला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भूमिपुत्रांच्या लढ्याच्या इतिहासातली ही सोनेरी पाने बाळासाहेबांनी लिहिली.

शिवसेनेपासूनच स्फूर्ती घेऊन पुढे आंध्र प्रदेशात एन.टी रामाराव या आणखी एका कलावंताने तेलुगु देसम्ची स्थापना केली आणि तेलुगु अभिमानाचे असे झंझावात उभे राहिले की, पहिल्या फटक्यातच 1982 साली आंध्रातील काँग्रेसची सत्ता उलथून पडली. आसामात प्रफुल्ल कुमार महंत या विद्यार्थी नेत्याने अशीच कमाल केली. त्यांच्या आसाम गण परिषदेने बंगाल्यांच्या प्रभुत्वाला आव्हान दिले आणि बघता बघता तिथले काँग्रेस सरकार गडगडले. महंत भारतीय इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. कर्नाटकात कर्नाटक क्रांती रंगा, बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, बंगालमध्ये गोरखा लँड मुक्ती संग्राम या आणि अशा चळवळी राज्याराज्यांत सुरू झाल्या, याचे कारण शिवसेनाच.

1966 साली निर्माण झालेल्या शिवसेनेने मुंबईतल्या मराठी माणसाला जगण्याची उभारी आणि लढण्याची हिंमत तर दिलीच, शिवाय मुंबईच्या कामगार जगावरची कम्युनिस्टांची लाल पकडही ढिली केली व पुढे तिला हद्दपारच केले. भारताच्या आर्थिक प्रगतीवरील एक मोठे अरिष्ट बाळासाहेबांमुळेच टळले.

बेफाम मागण्या करून गिरण्या, कारखान्यांत संप घडवून आणायचे आणि कामगाराला न्याय मिळवून देतो, असे भासवत उद्योग बंद पाडायचे, हे धंदे करणाऱ्या कम्युनिस्ट नेत्यांना बाळासाहेबांनी देशोधडीला लावले. म्हणूनच मुंबईतले उद्योग टिकले आणि इथल्या कामगारांचे रोजगार वाचले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावरही बाळासाहेबांनी छाप टाकली. तो काळ असा होता की, मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे कठीणच नव्हे, तर अशक्य बनले होते. मुंबईत काही चित्रपटगृहांत तामीळ, मल्याळी, तेलुगू चित्रपट झळकायचे आणि टिकायचे, पण मराठी चित्रपटांना मात्र थिएटर नाही. बाळासाहेबांनी या विरुद्ध आवाज उठवला. चित्रपट कलावंतांना एकत्र आणले. त्यातून चित्रपट सेनेचा जन्म झाला. मोर्चे निघाले, आंदोलने झाली. काही चित्रपटगृहांच्या काचा फुटल्या, खुर्च्या तुटल्या, पडदे फाटले, फिल्म जळल्या. पण अखेर मराठी चित्रपटांना न्याय व हक्काची थिएटर मिळू लागली.

अर्थात प्रांतिक अस्मिता जागी करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, हे बाळासाहेबांचे एकमेव इप्सित कार्य नव्हते. त्यांच्या महाराष्ट्रवादाला राष्ट्रवादाचा पाया आणि कणा होता. तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना चेतवणे, बाळासाहेबांचे महत्त्वाचे कार्य. 1971चे पाकिस्तानविरुद्धचे बांगला देश मुक्ती युद्ध असो किंवा 1996चे कारगील युद्ध, बाळासाहेबांनी राष्ट्रवादाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांचा राष्ट्रवाद जळजळीत व तेजस्वी होता. त्याची धग अनेकांना मानवणारी नव्हती. त्या आगीत आपण भस्म होऊ, या भीतीनेच अनेकांनी त्यांच्या राष्ट्रवादाला हिंदुवाद वा जातीयवाद अशी नावे ठेवली. बाळासाहेब सतत सांगत राहीले की, मी हिंदुवादी नसून हिंदुत्ववादी आहे आणि या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असणार. त्यांचा विचार तथाकथित बुद्धिमंत व निधर्मवाद्यांना समजायला आणखी काही काळ जावा लागेल, हे नक्की.

इतके मात्र खरे की आजही काश्मिरातील हिंदू पंडित आणि पंजाबातील शिख अभिमानाने आणि कृतज्ञतापूर्वन शब्दांत सांगतात की, बाळासाहेब होते म्हणून आज आम्ही हयात आहोत. बाळासाहेबांना यापेक्षा वेगळ्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.

असे बाळासाहेब आता नाहीत, त्यांचा फोनवरचा खणखणीत ‘जय महाराष्ट्र’ पुन्हा कानांची तहान शमवणार नाही, त्यांचे उंचावलेले हात पुन्हा अंगावर रोमांच उभे करणार नाहीत आणि त्यांचे केवळ ‘असणे’ आयुष्याचा नवा अर्थ समजावून देणार नाही, ही कल्पनाही सहन होत नाही. पण ते सत्य तर आहेच. समज आल्यापासून बाळासाहेबांना आगोदर व्यंगचित्रकार म्हणून, पुढे शिवसेना प्रमुख म्हणून आणि नंतर ‘माझा एकमेव नेता’ म्हणून जवळून पाहण्याचे भाग्य लाभले, याबद्दल विधात्याचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.

त्यांच्या सार्वजनिक आणि वैयिक्तक आयुष्यातील किती आठवणी सांगाव्यात? त्या खरेच शब्दबद्ध करायच्या, तर त्यासाठी जगातील कागदाचा साठाही संपून जाईल, तरीही काही आठवणी उरतीलच. अफाट स्मरणशक्ती आणि निर्भीड शब्दांची अचूक आणि धारदार निवड यांच्या जोरावर या माणसाने लाखो लोकांवर एकाच वेळी गारुड घातले आणि ते जवळपास अर्धे शतक तसेच कायम ठेवले.

व्यंगचित्रकारीतेतील डेव्हीड लो हा त्यांचा आदर्श. त्यांच्या फटकाऱ्यांचा बाळासाहेबांनी किती सूक्ष्म अभ्यास केला! त्यांची रेषन् रेष त्यांनी निरखून अभ्यासली. ‘माझं व्यंगचित्र हे केवळ माणसाच्या शरीराचे नसून ते त्याच्या स्वभावातील, कारकीदींतील व्यंग शोधत राहते, असे ते म्हणत. ते खरेच आहे. 1966मध्ये गुंगी गुढिया म्हणून इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. 1971 मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले व बांगला देशची स्थापना केली. पुढे त्याच इंदिरा गांधींनी एकाधिकारशाहीच्या लालसेने आणीबाणी आणली. या प्रत्येक वेळी बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारणाऱ्या इंदिरा गांधी बदलत राहिल्या. आचार्य अत्रे, कॉ. डांगे यांच्या व्यंगचित्रांतही असेच बदल झाले. हे होऊ शकले याचे कारण बाळासाहेबांचा प्रचंड व्यासंग. दररोज दोन डझन वर्तमानपत्रे काळजीपूर्वक वाचताना बाळासाहेब प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतीचा बारकाईने विचार करून त्याच्याबद्दलचे मत बनवत.

एक मात्र नक्की की, एकदा त्यांचा विचार पक्का झाला की, कोणत्याही मोहाला वा लोभाला बळी पडून त्यांचा विचार बदलत नसे. या वृत्ती अनेक परिणाम त्यांनी भोगले आणि फटके सोसले पण विचार बदलला नाही. अत्यंत शुष्क आणि निरस अशा राजकारणाच्या दुनियेत वावरताना त्यांनी आपल्यात दडलेल्या कलावंताला मरू दिले नाही, हे विशेष.

त्यामुळेच तर राजकारणातील वेगवेगळ्या पक्षांतील उच्चपदस्थांच्या जिगरी मैत्री बरोबरच चित्रपट, नाटक, चित्रकला या क्षेत्रांतील दिग्गजही त्यांच्या बैठकीत आवर्जून हजेरी लावत. कलावंत कितीही मोठा वा छोटा असला, तरी त्याच्या कलेला दाद देण्यात बाळासाहेब कुचराई करत नसत. त्यामुळेच शेवटचा शिवसैनिकही त्यांच्याशी मनाने जोडला गेला व तिथेच टिकूनही राहीला.

बाळासाहेब उक्तीने, कृतीने व वृत्तीनेही ‘मर्द’ होते. त्यामुळे मर्दमुकीची त्यांनी सदैव कदर केली. बाबरीची मशीद कारसेवकांनी पाडली, तेव्हा लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे सर्व नेतेही ‘दु:ख’ व्यक्त करत होते. मात्र बाळासाहेब कडाडले की, हे कृत्य जर शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्यांचा अभिमान वाटतो.’ त्यांच्या शब्दातल्या या अंगाराचे चटके ज्यांना लागायचे त्यांना नीट लागले आणि टीकेची धार बोथट झाली.

पाकिस्तान प्रशिक्षीत अतिरेकी भारतात दहशतवादी कारवाया करत होते, तेव्हाच भारताने पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात निमंत्रण दिले होते. शिवतीर्थावरील प्रचंड जाहीर सभेत बाळासाहेबांनी गर्जना केली की, हा सामना आम्ही मुंबईत होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी शिशीर शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिक साथीदारांनी ब्रबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी करोसीन ओतून निकामी केली. देशभर काही राजकारण्यांनी त्यांचा निषेध केला, तेव्हा बाळासाहेब समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. पुढे हा दौराच रद्द झाला आणि नंतरच्या घटना अशा की, भारत सरकारलाच पाकिस्तान संघाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ही झाली बाळासोबांची सार्वजनिक जीवनातील कामगिरी आणि त्यांची ओळख, पण आमच्या कुटुंबासाठी ही ओळख पुरेशी नाही. ठाकरे कुटुंब दादरच्या गल्लीत शिवसेनेच्या स्थापनेपर्यंत वास्तव्यास होते, त्याला खेटून असलेल्या गल्लीत आमचे घर होते. त्या काळात दादर हे एक विशाल कुटुंब असल्याने एका घरात भांडे पडले की त्याचा आवाज चार इमारती सोडून पलिकडे राहणाऱ्या बिऱ्हाडात ऐकू जायचा. त्यामुळेच एकमेकांशी साऱ्यांचेच घट्ट कौटुंबिक संबंध.

मला आठवतं, तेव्हापासून मी बाळासाहेबांना ओळखतच आहे. ठाकरे कुटुंबानेही ती ओळख तशीच कायम ठेवली, हे विशेष. त्यामुळेच माझ्या थोरल्या बहिणीने भरवलेलं बाटिक कलेच प्रदर्शन असो किंवा मला झालेला अपघात; बाळासाहेब स्वत: येऊन आस्थेनं विचारपूस करणार, हे ओघानं आलंच.

मी शाळेत असतानाची गोष्ट. चुलत भाऊ व मोठ्या बहिणीने बाटिक पेंटिंग्जचं प्रदर्शन दादरमध्येच भरवलं होतं. एका संध्याकाळी बाळासाहेब व श्रीकांतजी प्रदर्शनाला आले. त्यांनी तासभर ते प्रदर्शन बघितलं. त्या तरुण कलावंतांचं मनापासून कौतुक केलं. मार्मिकमध्ये छापण्यासाठी काही पेटिंग्जचे फोटो पाठवून द्यायला सांगितले आणि ते निघून गेले.

प्रदर्शन संपलं. एक दिवस घरी निरोप आला, त्यांनी माझ्या बहिणीला घरी बोलावलं होतं. आम्ही सारेच गेलो.

बाळासाहेब तिच्याबरोबर तास-दीड तास बाटिकबद्दल बोलत होते. तिला शेकडो प्रश्न विचारत होते. रंगसंगती आणि ब्रशचा वापर याविषयी बोलत होते. मला काहीच कळत नव्हतं. पण इतकं मात्र नक्की कळलं की, या माणसाचं कलेवर निस्सीम प्रेम आहे.

आम्ही उठलो, तेव्हा बाळासाहेबांनी कपाट उघडून दोन मोठ्ठी पुस्तके-कम-कॅटलोग बाहेर काढले आणि ते माझ्या बहिणीला भेट म्हणुन दिले. ‘मी कालच जुन्या पुस्तकांच्या दुकानातून ही पुस्तकं हुडकून आणलीत. बघ काही उपयोग होतो का?’ ‘ती पुस्तकं म्हणजे बाटिकची बायबल आहेत’, असं बहिण म्हणाली. तेव्हा ते फक्त हसले.

मी ‘द इंडिपेंडंट’ या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत असताना मला मोटरसायकलचा अपघात झाला. बराच काळ घरीच बिछान्यावर पडून राहावं लागलं. भेटायला माणसं येत-जात होती. अर्थात सारेच औपचारिक चौकशी करायचे आणि शुभेच्छा देऊन निघून जायचे.

एका संध्याकाळी बाळासाहेब आले. आमचे घर चौथ्या मजल्यावर आणि इमरतीला लिफ्टची सोय नाही. बाळासाहेबाची प्रकृती खुप चांगली नव्हती. तरीही ते चार मजले चढून आले. बिछान्यापाशी तासभर बसले. बरोबर त्यांनी कुठलीशी होमिओपॅथीची औषधं आणली होती. ती पत्नीकडे दिली आणि ती कशी द्यायची याच्या सविस्तर सूचनाही केल्या. डोक्याला मार लागल्याने उठता-फिरता येत नव्हतं.
‘वेळ कसा घालवतोस?’… बाळासाहेबांनी विचारलं.
काय उत्तर देणार? मी तसाच स्तब्ध.
त्यानीच काय ते ओळखलं. ते काहीही न बोलता निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर जोशींकडून एक माणूस व्हीसीआर प्लेअर घेऊन आला. संध्याकाळी ‘मातोश्री’कडून आणखी एक माणूस आला. त्याच्याकडे दोन डझन व्हिडिओ कॅसेट्स होत्या. त्यात चार्ली चॅप्लीनपासून मुगल-ए-आझमपर्यंतचे सिनेमे आणि अनेक क्रिकेट मॅचेसचे रेकॉर्डिंग होते. पाठोपाठ साहेबांचा फोन. ‘वेळ मिळेल तेव्हा सिनेमे बघत रहा, तुला बरं वाटेल’. साहेबांचा स्वर जड झालेला फोनलाही स्पष्ट जाणवलं.

नंतर बाळासाहेब आणखी बऱ्याच वेळा घरी येऊन गेले. असं प्रेम करणारा दुसरा नेता मी पाहिलेला नाही.

बाळासाहेब ठाकरे

आणखी एक आठवण. ‘इलस्ट्रटेड विकली’मध्ये माझा एक लेख छापून आला. त्याचे शीर्षक होते, ‘पेपर टायगर!’ या शीर्षकानेच खळबळ उडाली. नेमके त्याच काळात बाळासाहेब हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल होते. निरोप आला, ‘साहेबांनी बोलावलं आहे!’ मी तस्साच हॉस्पिटलमध्ये गेलो. साहेब चिडलेले होते. ‘असं का लिहिलंस? त्याचा थेट प्रश्न.
मी म्हटलं, ‘साहेब, तुम्ही लेख वाचलात का?’ त्यांनी नाही म्हटलं.
मी तातडीने धीर करून म्हटलं, ‘मग तुम्ही स्वत: तो वाचा. लेखातला मजकूर आणि शीर्षक यांचा काही संबंध आहे का, हे तुम्हीच तपासा. तुम्हाला जर वाटलं मी चुकीचं लिहिलं तर मी जाहीरपणे शिवाजी पार्कात ऊठाबशा काढीन.’
बाळासाहेब शांत झाले. नंतर फोन करतो म्हणाले.
दुपारीच फोन आला. ‘तू म्हणतोस ते बरोबर आहे…’ आणि मग पुढे संपादकाला शेलक्या शिव्यांची लाखोली.

1982मध्ये मन्या सुर्वे हा गुंड पोलिस चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. ती खोटी असून प्रत्यक्षात पोलिसांनी त्याला पॉइंर्ट ब्लँक गोळ्या घालून मारले, असे वृत्त मी दोन दिवसांनी दिले. माझ्याकडे पुरावे होते. पण जनक्षोभ असा की, माझं काही ऐकून घ्यायला कोणीही तयार नव्हतं. वाचकांच्या निषेधाच्या पत्रांचा पाऊस पडत होता. संपादकही नाराज झालेले. ते मला माफी मागायला सांगत होते, पण माझी त्याला तयारी नव्हती. माझे म्हणणे वाचकांपर्यंत पोहोचवा, इतकीच माझी मागणी. पण तीही मान्य होईना. याच तणावाच्या काळात बाळासाहेबांनी बोलावून घेतले. अनेक शिवसेना नेत्यांनी माझ्या बातमीला जाहीर विरोध केलेला असल्याने बाळासाहेब तसंच काही तरी बोलणार, असंच मनात होते.

‘मातोश्री’वर साहेबांना सारी परिस्थिती सांगितली. ते उठून उभे राहिले. माझ्या मागे येऊन माझे खांदे मागून धरुन म्हणाले, ‘बिल्कुल घाबरू नकोस. माफी तर मागूच नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.’ त्या शब्दांनी मला हत्तीचे बळ दिलं. इतकं करून ते थांबले नाहीत. मी दुपारी ऑफिसात गेलो, तेव्हा संपादकांनी केबिनमध्ये बोलावून सांगितलं, ‘ठाकरेंचा फोन आला होता. तू माफी मागायचं कारण नाही. पण यापुढे सांभाळून लिही. सत्यापेक्षाही सद्य परिस्थितीचं भान पत्रकारानं ठेवायला हवं.’
तो वाद तिथेच मिटला.

आणखी एक आठवण. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झालो, तेव्हाची. मी आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर गेलो. बाळासाहेबांना पुष्पगुच्छ देऊन नंतर त्यांना वाकून नमस्कार केला. बाळासाहेबांनी ‘यशस्वी भव’चा मनापासून आशीर्वाद दिला आणि नंतर ते म्हणाले, ‘आता तू संपादक आहेस. संपादकाने कोणाही पुढे वाकता कामा नये. यापुढे कोणालाही वाकून नमस्कार करायचा नाही. ताठ कण्यानं जगायचं!’

त्यांच्या त्या वाक्याने एक नवी दृष्टी दिली. तेव्हापासून संपादक म्हणून ना कुणापुढे वाकलो, ना कुणाला घाबरलो. हे घडू शकले, याचे एकमेव कारण बाळासाहेबांची शिकवण! असे बाळासाहेब. ते सहज बोलायचे, पण ते वैश्विक सत्य आणि तत्त्व असायचं.

आज बाळासाहेब शरिराने आपल्यात नाहीत. पण त्यांची शिकवण, विचार आणि त्यांच्या स्मृती पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करतच राहतील. त्यांचे आपल्यात असणे सूर्यासारखे स्वच्छ प्रकाश आणि ऊर्जा देणारे होते. आता त्यांचे नसणे काळोख्या रात्री निबिड अंधारात एकट्याच चमकणाऱ्या ताऱ्यासारखे आहे. अंधाराला छेद देत वाट दाखवण्याची शक्ती त्या प्रकाशाच्या तिरिपेत आहे.
तीच उद्याची आशासुद्धा आहे.

– भारतकुमार राऊत

(‘स्मरण’ या स्मृतिचित्र संग्रहातून)

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #बाळासाहेबठाकरे #स्मृतीदिन #एकदेणे #एकलेणे #भरतकुमारराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लोणार सरोवरची राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित
Next Article मोठा धोका टळला, दोन दहशतवाद्यांना अटक, पोलिस झाले सतर्क

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?