लोणावळा , 12 जून (हिं.स.)।पावसाने यंदा मान्सूनपूर्वीच हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक पर्यटक पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी गर्दी करतात. मात्र यंदाच्या पावसाळ्यात लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे.ही सक्ती 31 ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे.
गेल्या वर्षी लोणावळ्यातील भुशी डॅममधील धबधब्यात अख्ख कुटुंब वाहून गेलं होतं, या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या पर्यटनस्थळी कलम 163 लागू केले आहे. या दरम्यान पर्यटकांनी या पर्यटनस्थळी जाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. या पर्यटनस्थळातून भुशीधरण मात्र वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं हिरमोड झालेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. हा आदेश 7 जुन पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे.
एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लागू केले आहेत.