लासलगाव, ७ ऑगस्ट –
बांगलादेश सरकार भारतावर लादलेली कांद्याची निर्यातबंदी लवकरच उठवण्याच्या तयारीत आहे. यामुळे विशेषतः महाराष्ट्रातील कांद्यांची निर्यात पुन्हा सुरु होण्याची शक्यता असून कांद्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशने कांद्याच्या आयातीवर बंदी घातल्यामुळे नाशिक, लासलगाव यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये दरात सातत्याने घसरण झाली होती. यामागे दक्षिण आणि उत्तर भारतातील कांद्याचे पुरवठा वाढल्याचाही परिणाम होता.
मात्र आता बांगलादेशातील कांद्याचा साठा संपत चालला आहे आणि त्याठिकाणी मागणी वाढली आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याला पुन्हा परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात वाढेल आणि स्थानिक बाजारात दर चढतील, अशी शक्यता आहे.
भरत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, कांदा उत्पादक संघ, यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, “निर्यातीबाबत ठोस धोरण आखले पाहिजे. कारण जर वेळेत निर्णय घेण्यात आला नाही, तर परदेशी बाजारपेठांवर इतर देशांचे कांदे ताबा मिळवू शकतात.” त्यांनी स्पष्ट केलं की, “शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि देशाला परकी चलन मिळावं यासाठी केंद्र सरकारने तातडीने भूमिका घ्यावी.”